Join us

बाहेरून कोणीतरी अर्भक आणून टाकले? महापौरांची आकस्मिक भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 1:56 AM

बाहेरून कोणीतरी अर्भक आणून टाकल्याची शक्यता असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाकडून शुक्रवारी महापौर किशोरी पेडणेकर यांना सांगण्यात आले.

मुंबई : बाहेरून कोणीतरी अर्भक आणून टाकल्याची शक्यता असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाकडून शुक्रवारी महापौर किशोरी पेडणेकर यांना सांगण्यात आले. अशा घटना रुग्णालयात घडू नयेत, याची खबरदारी घेण्याची ताकीद महापौरांनी रुग्णालय प्रशासनाला दिली. रुग्णालयात दररोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने बाह्य रुग्ण विभाग संध्याकाळच्या वेळेतही सुरू करण्याची सूचना महापौरांनी केली.केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर या तीन महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर आता २४ आठवड्यांचे मृत मानवी भ्रूण मांजरीने खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या घटनांची गंभीर दखल घेऊन केईएम रुग्णालयातील कारभाराची झाडाझडती घेण्यासाठी महापौर पेडणेकर यांनी शुक्रवारी अचानक जाऊन तेथे पाहणी केली. या प्रकरणाचा अहवाल त्यांनी प्रशासनाकडून मागितला आहे.केईएम रुग्णालयाच्या गेट क्र. ७ जवळ जैववैद्यकीय कचरा ठेवण्याची खोली आहे. येथे शवविच्छेदन केलेले काही अवयव सीलबंद करून ठेवले जातात. त्या ठिकाणी २४ आठवड्यांचे भ्रूण मांजर खात असल्याचे आढळून आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे महापौर पेडणेकर यांनी केईएममधील शवविच्छेदनगृहाला आकस्मिक भेट दिली. त्याचबरोबर बाह्य रुग्ण विभाग आणि सुरक्षा व्यवस्थेचीही पाहणी केली.नातेवाइकांची गर्दी नकोपालिका रुग्णालयात रुग्णाबरोबर येणाऱ्या नातेवाइकांची संख्याही जास्त असते. त्यामुळे एका रुग्णाबरोबर एक नातेवाईक अशी मर्यादा घालण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

टॅग्स :केईएम रुग्णालयमुंबईमहापौर