आयसीयूत कुणाची आई, कुणाचे बाबा; देवा, जगण्याची लढाई पाहवत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 10:15 AM2023-08-11T10:15:48+5:302023-08-11T10:15:58+5:30

रुग्णाच्या नातेवाइकांची होणारी घालमेल पाहून हृदय पिळवटून जाते

Someone's mom, someone's dad in ICU; God does not watch the battle for survival | आयसीयूत कुणाची आई, कुणाचे बाबा; देवा, जगण्याची लढाई पाहवत नाही

आयसीयूत कुणाची आई, कुणाचे बाबा; देवा, जगण्याची लढाई पाहवत नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  हॉस्पिटलची पायरी चढू नये, असे म्हटले जाते. मात्र, आजारपण काही कुणाला सांगून येत नाही. कधी अपघात घडेल आणि त्या व्यक्तीला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागेल याची कुणाला पुसटशीही कल्पना नसते. आपण अनेक जण आपल्या कामात व्यस्त असतात, आपल्या कुटुंबासोबत नियमित आयुष्य जगत असतो. मात्र, त्याचवेळी शहरातील रुग्णालयाच्या आयसीयूत कुणाची आई तर कुणाचे बाबा मृत्यूशी झुंज देत असतात. 

रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाचे नातेवाईक तो रुग्ण बरे होण्यासाठी देवाचा धावा करीत असतो. काही जण आपला नातेवाइक बरा व्हावा, म्हणून देवाला नवस करीत असतात. काहीवेळा त्या संबंधित रुग्णाला इतक्या असह्य वेदना होत असतात की त्याला त्यातून मुक्ती दे, अशी याचना देवाकडे करतानाचे नातेवाईक आयसीयूबाहेर दिवसभर बसून असल्याचे चित्र मुंबईतील सर्वच मोठ्या रुग्णालयात पाहायला मिळते.  सरकारी रुग्णालयात तर हे चित्र अधिकच भयाण असते.  (रुग्णांच्या नातेवाइकांची नावे बदललेली आहेत.)

50 पेक्षा अधिक दिवसांपासून रुग्णालयात
पायाला खडा लागला म्हणून बाबांच्या पायाला लहान जखम झाली. मात्र, जखम आठ दिवसांच्या उपचारानंतर बरी झाली नाही. उलट जखम अजूनच मोठी होत गेली. कारण त्यांना मधुमेहाचा त्रास होता.
 काही डॉक्टरांकडे उपचार केले. मात्र, फार काही यश आले नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की, त्यांचे वय अधिक आहे, त्यामुळे ते उपचाराला प्रतिसाद फार संथ गतीने मिळत आहे. मात्र, पायातील संसर्ग इतका वाढला की त्यांच्या पायाचे एक बोट त्यावेळी कापायला लागले. त्यानंतर गेले काही दिवस रुग्णालयात ठेवून त्यांच्या साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे काम डॉक्टरांनी सुरू केले. 
 मात्र, साखरेचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होताना दिसत होता. पायाच्या जखमेतून बरे होत असताना त्यांना  किडनीचा त्रास सुरू झाला. त्याकरिता त्यांना तत्काळ आयसीयूमध्ये हलविले. गेली सहा दिवस ते आयसीयूमध्येच आहेत. त्यांच्या पोटात पाणी झाले असून त्याचा परिणाम यकृतावर झाला आहे. त्यांची परिस्थिती आजही तशीच आहे. देवाकडे आम्ही प्रार्थना करतोय की त्यांना लवकर या आजारातून बरे कर.    
    -श्रीनिवास सावंत, रुग्णाचा मुलगा, जे. जे. रुग्णालय 

 डॉक्टर म्हणतात, 
 होतील लवकर बरे  
गेल्या तीन दिवसांपासून त्यांना  आयसीयूमध्ये दाखल केले आहे. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता, त्यामुळे ते अचानक चक्कर येऊन पडले. त्यांना थोडा मार लागला आहे. मात्र, हळूहळू त्यांची तब्येत चांगली होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. आमच्या  कुटुंबातील सर्व सदस्य हे दिवस- रात्र रुग्णालयात ये- जा करीत आहेत. आजपर्यंत कुणी आमच्या घरातले आयसीयूमध्ये गेले नव्हते.  त्यामुळे सगळ्यांच्याच मनात यांच्या तब्येतीविषयी भीती निर्माण झाली आहे.        
-वैशाली निकम, 
रुग्णाची पत्नी, जे. जे. रुग्णालय 

आयसीयूच्या बाहेर बसलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांविषयी विशेष काळजी घेतली जाते. याकरिता आमच्या परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी नातेवाइकांना वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतात. तसेच वरिष्ठ डॉक्टरही रुग्णाला नक्की काय आजाराचे निदान झाले आणि त्याच्यावर कोणते उपचार सुरू आहेत हे व्यवस्थित सांगतात. कारण आयसीयूमध्ये भरती असलेले रुग्ण हे गंभीर असतात. कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यासाठी रुग्णालयाच्या बाजूने जितके सहकार्य करता येईल तेवढे करत असतो. काही रुग्णाच्या नातेवाईकांना पैशांची अडचण येते. त्यावेळी समाजसेवा विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो.  
- डॉ. संजय सुरासे, 
अधीक्षक, सर जे. जे. रुग्णालय

Web Title: Someone's mom, someone's dad in ICU; God does not watch the battle for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.