मुंबई : तब्बल १६ वर्षांनी पुत्ररत्नाचा लाभ झाल्यामुळे कुटुंबीय आनंदात होते. मात्र, कुटुंबाचा हा आनंद क्षणिक ठरला, कारण रुग्णालयाने मातेच्या हातात मुलगी सोपवली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी वाडिया रुग्णालयाचे डॉक्टर आणि परिचारिका यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून बाळ आणि मातेचे डीएनए नमुने तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत.
तक्रारदार महिला प्रभादेवी परिसरात राहण्यास आहे. त्यांचे पती कपड्यांच्या व्यवसायात आहेत. दाम्पत्याला १६ वर्षांची मुलगी आहे. पुत्रप्राप्तीसाठी आयएव्हीएफ तंत्रज्ञानाने त्यांनी उपचार केले. ७ जूनला वाडिया रुग्णालयात तक्रारदार महिलेची प्रसूती झाली. मात्र, नवजात अर्भकाचा बऱ्याच वेळानंतर ताबा मातेकडे देण्यात आला. मात्र, मुलाला जन्म दिला असताना मुलगी हातात दिल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. डीएनए चाचणीत ते बाळ त्यांचे नसल्याचे समजले.
तपास सुरू
बाळ व मातेचे डीएनए सॅम्पल तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. त्याच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी सांगितले.