लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाकाळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वितरणात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी उद्धवसेनेचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स जारी केल्यानंतर अखेर सोमवारी सकाळी ११ वाजता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आणि सायंकाळी ७ च्या दरम्यान तेथून बाहेर आले. यापूर्वी २७ मार्च रोजी त्यांना पहिल्यांदा ईडीने चौकशीसाठी समन्स जारी केले होते. त्याच दिवशी त्यांना उद्धवसेनेकडून लोकसभेसाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी ते चौकशीसाठी गेले नव्हते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी त्यांनी चौकशीसाठी हजर राहावे, यासाठी त्यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स जारी केले होते.
प्राप्त माहितीनुसार, कोविडकाळात झालेल्या या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२३ मध्ये गुन्हा नोंदवला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, बाळा कदम, राजीव साळुंखे, तसेच मुंबई महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची याप्रकरणी चौकशीदेखील करण्यात आली होती. याप्रकरणी एकूण ६ कोटी ३७ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्याच दरम्यान, अमोल कीर्तिकर यांची देखील पोलिसांनी सहा तास चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या या तक्रारीच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने यापूर्वीच अटक करत त्यांची मालमत्ता देखील जप्त केली आहे.
मी चौकशीत पूर्ण सहकार्य केले आहे. मला जे प्रश्न विचारले, मी त्याची उत्तरे अधिकाऱ्यांना दिली आहेत. मला ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले नाही.- अमोल कीर्तिकर, उद्धवसेनेचे नेते