दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस भाजपाच्या वाटेवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 07:15 PM2019-05-22T19:15:25+5:302019-05-22T19:15:51+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस हे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व बीडमधील मोठे प्रस्थ असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी आजच शिवसेनेत प्रवेश केला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस हे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. हनुमंतराव डोळस यांच्या निधनानंतर संकल्प हे येथील भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून हनुमंतराव डोळस ओळखले जात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीत संकल्प डोळस हे भाजपाचे माळशिरसचे आमदारकीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या 30 एप्रिल रोजी आमदार हनुमंतराव डोळस यांचे मुंबईत कर्करोगाने निधन झाले होते. गेली 10 वर्षे त्यांनी माळशिरसचे आमदार म्हणून प्रभावी कामगिरी केली होती. काल त्यांची मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रार्थना सभा ठेवली होती. यावेळी खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सायंकाळी 5.30 वाजता उपस्थित राहून हनुमंतराव डोळस यांना आपल्या भाषणातून श्रद्धांजली वाहून गेली 10 वर्षे आपला त्यांच्याशी संपर्क आला.
सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या आमदारकीच्या कार्याचा गौरव करून यावेळी मुख्यमंत्र्यांनी हनुमंतराव डोळस यांच्या पत्नी कांचन, मुलगा संकल्प व कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, आमदार किरण पावसकर, आमदार अबू आझमी, आमदार सुनील शिंदे, माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील या प्रार्थना सभेला उपस्थित राहून डोळस कुटुंबीयांची भेट घेतली.
याप्रकरणी संकल्प डोळस यांच्याशी संपर्क साधला असता,यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.