मुंबई - माजी खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या मुलाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 98.33 टक्के गुण घेत प्राविण्य मिळवले आहे. पुष्कराज राजीव सातव याचा केंद्रीय माध्यमिक शालांत परीक्षेतून ICSE दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या गुणपत्रिकेत 98.33 टक्के गुण मिळवत पुष्कराजने स्वत:ला सिद्ध केले आहे. पुष्कराजचं सोशल मीडियातून आणि काँग्रेस समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
राजीव सातव यांचं काही महिन्यांपू्र्वी अकाली निधन झालं. काँग्रेसने एक चाणाक्ष आणि बडा नेता राजीव यांच्यारुपाने गमावला. सातव कुटुंबीयांसह राजीव यांच्या निधनाचं दु:ख महाराष्ट्राला आणि देशातील काँग्रेस समर्थकांना झालं आहे. अगदी लहान वयातच पुष्कराज याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवे आहे. यंदा पुष्कराजचा दहावी निकाल लागला, त्याने उत्कृष्ट गुण घेत प्राविण्य मिळवलं. पण, दुर्दैवाने लेकाच्या दहावीच्या निकालाचे सेलिब्रेशन करण्याची राजीव सातव आपल्यात नाहीत. नियतीने मोठा आघात सातव कुटुंबीय आणि पुष्कराज यांच्यावर केला आहे. मात्र, पुष्कराजच्या या प्राविण्याचं सोशल मीडियातून कौतुक होत आहे.
सातव कुटुंबीयांच्या पाठिशी काँग्रेस सदैव - राहुल गांधी
राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या निधनानंतर व्यक्त केल्या होत्या.