व्हॉट्सअॅपमुळे हरवलेल्या मुलाचा शोेध
By admin | Published: April 5, 2016 01:11 AM2016-04-05T01:11:43+5:302016-04-05T01:11:43+5:30
एक चार वर्षांचा मुलगा कुतुहलापोटी नालासोपारा शहरातून निघालेल्या मोर्चात सामील झाला. वसईत मोर्चा संपल्यानंतर सगळी पांगापांग झाली आणि अचानक एकटा पडलेल्या
नालासोपारा : एक चार वर्षांचा मुलगा कुतुहलापोटी नालासोपारा शहरातून निघालेल्या मोर्चात सामील झाला. वसईत मोर्चा संपल्यानंतर सगळी पांगापांग झाली आणि अचानक एकटा पडलेल्या चिमुकल्याचा धीर खचला. अगदी अनोळखी शहरात आल्याने भेदरलेल्या मुलाने हंबरडा फोडला. त्यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या माणिकपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सहा दिवस त्याचा सांभाळ केला. मुलाच्या आईवडिलांना शोधण्यासाठी पोलिसांनी व्हॉटसअॅपवर मॅसेज टाकला. हा मॅसेज तब्बल सहा दिवसांनी मुलाच्या वडिलांना व्हॉटसअॅपवर दिसला आणि त्यांनी थेट माणिकपूर पोलीस स्टेशन गाठले तेव्हा मुलाला समोर पाहून त्यांचा जीव भांडयात पडला.
जावेद सलाउद्दीन नावाचा चार वर्षांचा मुलगा पाण्यासाठी निघालेल्या मोर्चात कुतुहलापोटी सामील झाला. पाण्यासाठी निघालेला मोर्चा थेट वसईत जाऊन पोचला. मोर्च्यातील लोक पांगल्यानंतर एकाकी पडलेला जावेद भेदरून गेला. कुणीच ओळखीचे दिसत नव्हते, ना शहर ओळखीचे होते. त्यामुळे त्यांने हंबरडा फोडला. रडत असलेला जावेद बंदोबस्तासाठी असलेल्या माणिकपूर पोलिसांच्या नजरेत पडला. त्यांनी जावेदची समजूत काढून त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्नही केला. पण, चिमुकला जावेद काही सांगू शकला नाही. शेवटी पोलिसांनी त्याला माणिकपूर पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी व्हॉटसअॅपवर फोटोसह मॅसेज टाकून शोध मोहिम सुरु केली. हा मॅसेज पाहून राष्ट्रीय अमन मंचच्या महिला अध्यक्षा शमीम फिरोज खान यांनी त्यांच्या राष्ट्रीय अमन मंचच्या ग्रुपवर टाकला. त्यानंतर तोच फोटो राष्ट्रीय अमन मंचच्या नालासोपारा उपाध्यक्षा जयश्री कदम यांनी त्यांच्या गु्रपवर टाकला. असे करता तो फोटो हरवलेल्या मुलाच्या आई वडिलांपर्यंत पोहचला. व्हॉटसअॅपवर हरवलेल्या मुलाचा फोटो पाहून त्यांनी जयश्री कदम व त्यानंतर शमीम फिरोज खान यांच्याशी मोबाईवर संपर्क साधला.