Join us

गिरणी कामगाराचा मुलगा ते प्रदेशाध्यक्ष, संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 6:33 AM

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर ज्येष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ या सूत्रानुसार दानवे यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले असले, तरी हा नियम पाटील यांना लागू केलेला नाही.रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्ती, तसेच अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला जिंकून देण्यात सिंहाचा वाटा या घटकांमुळे चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले असे मानले जाते.

विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने आता त्यांची कसोटी लागणार आहे. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदही कायम राहणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोअर टीममधील नेते अशी चंद्रकांतदादांची ओळख आहे. भाजपमधील आश्वासक मराठा नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. केंद्रात राज्यमंत्रीपद मिळालेले दानवे यांनी मंगळवारी सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपविला. त्यानंतर पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली.
शेलारांच्या जागी लोढामुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या जागी दक्षिण मुंबईतील मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लोढा हे आतापर्यंत प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते. शेलार यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळात झाल्यानंतर नवा अध्यक्ष कोण या बाबत उत्सुकता होती. खा.मनोज कोटक, आ.अतुल भातखळकर यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, मंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या लोढा यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. ते हिंदी भाषिक (राजस्थानी) आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने एका वजनदार नेत्यास अध्यक्षपद दिले.आमदार मंगल प्रभात लोढा हे विधानसभा निवडणुकीत १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा मलबार हिल मतदारसंघातून निवडून आले. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ७० हजार मतांनी विजय मिळविला. मंगल प्रभात लोढा यांचा जन्म १८ डिसेंबर १९५५ रोजी जोधपूर येथे झाला. जोधपूर विश्वविद्यालयामधून बीकॉम, एलएलबीचे शिक्षण घेऊन ते वकिली पेशात उतरले. जोधपूर विश्वविद्यालयाचे ते महासचिवही होते. विद्यार्थीदशेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडले गेले. मंगल प्रभात लोढा यांचे वडील गुमानमल लोढा प्रख्यात न्यायाधीश असून तीन वेळा खासदार होते.>विधानसभा निवडणुकीचे आव्हान समोर असताना मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली याचा विशेष आनंद आहे. पक्ष संघटना सदैव तत्पर असते. त्याच्या भक्कम बळावरच माझी वाटचाल असेल. लोकसभा निवडणुकीतील युतीच्या विजयाची पुनरावृत्ती विधानसभेत निश्चितच होईल.- चंद्रकांत पाटील,भाजप प्रदेशाध्यक्ष.देशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या महानगराचे अध्यक्षपद मला पक्षनेतृत्वाने दिले याचा आनंद आहे. पक्षसंघटनेसाठी मी सातत्याने काम करीत आलो आहे. पक्षसंघटनेतील सर्वांच्या सहकार्याने आणि समन्वयाने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन. - आ.मंगलप्रभात लोढा,मुंबई भाजप अध्यक्ष.>गिरणी कामगाराचा मुलगा ते प्रदेशाध्यक्षचंद्रकांत पाटील हे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. रा.स्व.संघाच्या माध्यमातून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते झाले. परिषदेचे राष्ट्रीय महामंत्रिपद त्यांनी भूषविले. तेथून ते संघात परतले आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात संघाचे काम सुरू केले, नंतर त्यांना भाजपमध्ये पाठविण्यात आले. पुणे पदवीधर मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलमंगलप्रभात लोढाभाजपा