Join us

मदरसामधून बेपत्ता झालेला मुलगा पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 3:30 AM

कांदिवलीतील मदरसामधून एक अल्पवयीन मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली.

मुंबई : कांदिवलीतील मदरसामधून एक अल्पवयीन मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत त्याचा शोध घेत, त्याला पालकांच्या स्वाधीन केले. बुधवारी हिंदुस्थान नाका परिसरातील रहिवासी जुनैद शहा (३८) यांनी त्यांचा १३ वर्षांचा मुलगा शोएब साबरीया मशीदमधून अचानक गायब झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्यासोबत काही अनुचित प्रकार घडू नये, अशी चिंता त्याच्या पालकांना वाटत होती. कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले यांनी तातडीने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सावंत यांच्या नेतृत्वाखाली हवालदार घोरपडे आणि पोलीस नाईक पवार यांच्या पथकाची नियुक्ती केली. या पथकाने मदरसाच्या आसपासच्या परिसरात तसेच त्याच्या नातेवाइकांकडे शोएबचा शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर सतत तपास केल्यानंतर मार्वे रोड येथील मालवणीच्या कब्रस्तान फुटपाथवर शोएब त्यांना सापडला. तो रस्ता चुकल्याने तेथे पोहोचला होता. त्यानुसार पोलिसांनी शोएबच्या पालकांना याबाबत कळवत त्याला त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी शिताफीने शोएबचा शोध घेत पालकांकडे सोपविल्याबाबत त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.