Join us

झालं संधीचं सोनं... आणि उभा राहिला बाळासाहेबांचा भव्य पुतळा!

By admin | Published: January 05, 2017 5:56 AM

कल्याणच्या ऐतिहासिक काळा तलाव परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २२ फुटी पुतळा उभा राहीला आहे

प्रशांत माने , कल्याणकल्याणच्या ऐतिहासिक काळा तलाव परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २२ फुटी पुतळा उभा राहीला आहे. त्याचे लोकार्पण शनिवारी होणार आहे. मात्र मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत वेगवेगळ््या कलाकारांनी, तंत्रज्ञांनी घेतलेली अविरत मेहनत, त्यांना जे. जे. स्कूलचे मिळालेले साह्य, बाळासाहेबांच्या हावभावांच्या अभ्यासातून त्यांची निवडलेली मुद्रा यांचा सुरेख संगम या पहिल्यावहिल्या पुतळ््यातून पाहायला मिळतो. स्वत: कलावंत असलेल्या या कलंदर नेत्याचे अनेक पैलू या पुतळ््यातून अजरामर झाले आहेत.१९९० व्या दशकात शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राभर झंझावाती दौरे करून युतीची सत्ता आणली. हाच संदर्भ या पुतळयाच्या उभारणीच्या प्रक्रियेत डोळ््यापुढे ठेवल्याची भावना मुंबईतील कलावंत संजय सुरे यांनी व्यक्त केली. त्यातूनच साकारली बाळासाहेबांची देहबोली. बाळासाहेबांचे २०१२ च्या नोव्हेंबरमध्ये निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कल्याणमध्ये स्मारक उभारण्याचा ठराव केडीएमसीच्या २०१३ च्या महासभेत संमत झाला. कल्याणमधील ऐतिहासिक काळा तलाव परिसरात हे स्मारक आता पूर्णत्वाला आले आहे. मुंबईतील कलावंत संजय सुरे यांच्याकडे बाळासाहेबांचा पुतळा साकारण्याचे काम सोपविण्यात आले. यात त्याना साथ लाभली, संदीप राऊत, मंदार दहीबावकर, संताजी चौगुले आणि सचिन लोलगे या कलाकारांची. शिवसेनाप्रमुखांची देशभरात हिंदूहदयसम्राट म्हणून ख्याती आहे. त्याचवेळी ते मराठी अस्मितेचे जाज्ज्वल्य प्रतिकही आहेत, हे डोळ््यापुढे ठेवून पुतळ््याची आखणी सुरू झाल्याचे सुरे म्हणाले. ही व्यक्तीरेखा पुतळयाच्या स्वरूपात उभी करताना या टीमने बाळासाहेबांचा जीवनपट डोळ््यापुढे ठेवला. बाळासाहेबांनी १९९० च्या दशकात झंझावाती दौरे करून प्रभावी आणि ओजस्वी भाषणाने युतीचा झेंडा फडकविला, तो काळ आणि संदर्भ पुतळ््याच्या उभारणीत निश्चित करण्यात आला. त्या काळात बाळासाहेब जिल्हा आणि तालुकास्तरावर जिथे जिथे सभा घेत असत, तेथे व्यासपीठावर चढताच सभेला जमलेल्यांना विशिष्ट पद्धतीने अभिवादन करत. तीच पोझ-ती देहबोली पुतळ््याच्या स्वरूपात साकराण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी मोलाची मदत झाली, ती बाळासाहेबांचे चिरंजीव आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची. बाळासाहेब स्वत: अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. पत्रकार, व्यंगचित्रकार, उत्तम वक्ते, प्रभावी राजकारणी, अजोड संघटनकौशल्य असलेले त्यांचे वक्तिमत्त्व साकारताना या साऱ्यांचा बारीकसारीक विचार झाला. त्यांचा पुतळा कुठल्या वयातला असावा, हे ठरवण्यात आले. बाळासाहेबांचे तरूणपणीचे व्यक्तिमत्त्व, जसजसे वय वाढत गेले तसे त्यांचे दाढी वाढलेले ॠ षीतुल्य व्यक्तिमत्त्व असे अनेक कंगोरे आपल्यासमोर येतात. यातील १९९० ते १९९५ या काळातील बाळासाहेबांची भाषणे थेट जनतेशी संवाद साधणारी होती. या त्यांच्या पैलूचा विचारही पुतळा साकारताना झाल्याचे सुरे यांनी सांगितले.शिवाजी पार्कवर संयुक्त महाराष्ट्राचे भव्य दालन आम्ही साकारले होते. परंतु बाळासाहेबांचा देशातील पहिला २२ फुटी भव्य पुतळा उभारण्याचे भाग्य आम्हाला लाभले आणि मिळालेल्या संधीचे आमच्या टिमने खऱ्या अर्थाने सोने केले, असे सुरे अभिमानाने सांगतात. पुतळ््याचे काम दीड वर्षे चालले. मुंबईतील ताडदेव भागातील करेज या स्टुडीओत तो बनविण्यात आला. प्रारंभी दीड आणि नऊ फुटांची मॉडेल तयार करण्यात आली. त्यानंतर २२ फुटांचा पुतळा तयार करण्यात आला. कोल्हापुरातील संताजी चौगुले यांच्या फाँड्रीत पुतळ््याला मेटलचे स्वरूप देण्यात आले. पुतळा साकारताना चेहरेपट्टीतील, व्यक्तित्त्वातील अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार करण्यात आला होता. यात बाळासाहेबांच्या गळ््यातील रूद्राक्षाची माळ, ओम अक्षराचे लॉकेट, ते वापरत असलेल्या कपड्यांचा, त्यांच्या पायातील चपलांचा अभ्यास करण्यात आला. पुतळा उभारण्याच्या कामात जे. जे. स्कूल आर्टसचे कलाशिक्षक नितीन मेस्त्री, प्रो. वंजारी, चित्रकार सुहास बहुलकर, उत्तम पाचारणे यांचेही मोलाचे योगदान लाभल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या बाळासाहेबांचा पुतळा आम्ही साकारला, याचा निश्चितच आनंद आहे. कल्याणातील स्मारकाच्या ठिकाणी उभारण्यात आलेले पीलर आणि साकारण्यात आलेल्या शिल्पांची डेकोरेटिव्ह कामेही आमच्याच टीमने केल्याचे सुरे म्हणाले.