मुंबई - पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे मोरवाडीचे प्रतिनिधीत्व करणारे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र ,घोळवे यांना फक्त पाच महिन्यांसाठी ही संधी दिली आहे. पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आपल्या निवडीनंतर घोळवे यांनी मुंबईत जाऊन भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडेंची भेट घेतली.
पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केशव घोळवे यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, केशव यांचे अभिनंदन करताना, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपमहापौर झाला याचा मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, पुढील कार्यासाठी घोळवे यांना पंकजा मुंडेंकडून शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. त्यावेळी, खासदार प्रीतम मुंडे याही उपस्थित होत्या.
पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबरला तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली. शुक्रवारी महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सव्वा अकरा वाजता अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. सभागृह नेते नामदेव ढाके, केशव घोळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत कदम यांनी माघार घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसची माघार
उपमहापौरपदासाठी सोमवारी सत्ताधारी भाजपकडून केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला होता. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने त्याचवेळी त्यांची निवड निश्चित झाली होती. पण, संख्याबळ नसल्याचे आणि कोरोनाचे कारण देत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती, विषय समिती सभापतीपदाची निवडणूक न लढविणाऱ्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. पिंपरीगावाचे प्रतिनिधीत्व करणा-या निकिता कदम यांचा अर्ज दाखल केला होता. अखेरिस त्यांनी माघार घेतली. घोळवे यांची बिनविरोध निवड झाली.
उर्वरित कालखंडात दोन जणांना संधी
उर्वरित कालखंडात दोन जणांना संधी द्यायची असल्याने उपमहापौर पदी केवळ पाच महिन्यांसाठी संधी दिली असून त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतला आहे. पिंपरी पालिकेच्या उपमहापौरपदासाठी भाजपने केशव घोळवे यांना संधी दिली आहे. त्याआधी, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक व मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र भाजपातील काही कार्यकर्त्यांनी घोळवे यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. पडद्यामागील अनेक नाटय़मय घडामोडीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोळवे यांचे नाव निश्चित केल्यानंतर आमदार महेश लांडगे यांचा गट नाराज झाला. पक्षातील नाराजीचा फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून घोळवे यांना पूर्ण कालावधीऐवजी पाच महिन्यांपुरतेच उपमहापौरपद देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे.