मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोमवारी (3 डिसेंबर) पहाटे न्यू-यॉर्कमधून मायदेशी परतली आहे. न्यू-यॉर्कमध्ये कॅन्सर आजारावर औषधोपचार घेतल्यानंतर सोनाली तब्बल जवळपास पाच महिन्यांनंतर मुंबईमध्ये दाखल झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाय ग्रेड कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती सोनालीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. यानंतर उपचारांसाठी ती न्यू-यॉर्कमध्ये रवाना झाली होती.
दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर सोनालीचे पती गोल्डी बहल यांनी सांगितले की, सोनालीची प्रकृती सुधारत आहे. सध्या तिच्यावरील उपचार थांबवण्यात आले आहेत. पण हा आजार पुन्हा कधीही बळावू शकतो. त्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी सुरूच राहतील.
मायदेशी परतणार असल्याची माहिती खुद्द सोनालीनं रविवारी (2 डिसेंबर) इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. आपल्या देशात येणे हे किती खास बाब आहे, असे तिनं इन्स्टा पोस्टमध्ये शेअर केले होते. दरम्यान, काही काळ विश्रांती घेऊन सोनाली पुन्हा उपचारांसाठी न्यू-यॉर्कला रवाना होणार आहे.
काय म्हटलंय सोनालीनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये?
घरापासून अंतर वाढत तसतस आपलं आपल्या घराशी असलेल नातं घट्ट होत जातं. न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरशी लढताना मी हेच शिकले. आता मी माझे हृदय जिथे वसते, त्या माझ्या घरी परतते आहे. घरी परतण्याचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबाला, मित्रांना भेटणार, याचा खूप आनंद आहे, असे सोनालीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अर्थात कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अद्याप संपलेली नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे. ‘कॅन्सरशी झुंज संपलेली नाही. पण यादरम्यान मिळालेल्या मध्यांतराचा आनंद आहे. आपल्या माणसांना भेटून मी अधिक ताकदीने कॅन्सरशी लढू शकेल, असे तिने म्हटले आहे.
(माझे अख्खे कुटुंब कॅन्सरच्या वेदना भोगतेय! लग्नाच्या वाढदिवसाला भावूक झाली सोनाली बेंद्रे!!)