Join us

सोनसाखळीचोरी आली निम्म्यावर

By admin | Published: January 02, 2015 10:48 PM

नानाविध गुन्ह्यांची उकल करण्यात १०० टक्के यश संपादन केले असले तरी सोनसाखळीचोरी उघड करण्यात अद्याप ५० टक्के यश आल्याचे समोर आले आहे.

राजू काळे - भार्इंदरमीरा-भार्इंदर पोलीस विभागाने २०१४ या वर्षात घडलेल्या नानाविध गुन्ह्यांची उकल करण्यात १०० टक्के यश संपादन केले असले तरी सोनसाखळीचोरी उघड करण्यात अद्याप ५० टक्के यश आल्याचे समोर आले आहे. या सर्व गुन्ह्यांतील चोरटेही लवकरच गजाआड होण्याचे संकेत उपअधीक्षक सुहास बावचे यांनी लोकमतला दिले आहेत. जिल्हा ग्रामीण पोलीस दलांतर्गत शहरात पाच पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यात नयानगर पोलीस ठाण्याची भर पडणार असली तरी त्यासाठी अद्याप जागेची तजवीज झालेली नाही. २०१४ या वर्षात शहरात विविध गुन्हे घडले असून गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचाही त्यात समावेश आहे. त्यात सोनसाखळीचोरीचे ८४ गुन्हे घडले असून त्यातील ४५ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत गजाआड करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १०० टक्के मुद्देमाल जप्त केला असल्याने गृहिणींना चोरीला गेलेला ऐवज १०० टक्के परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शहरात हत्यांचे ११ गुन्हे, दरोड्यांचे ९ गुन्हे, बलात्कारांचे ४५ गुन्हे घडले असून हे सर्वच्या सर्व गुन्हे पोलिसांनी काही दिवसांतच उघडकीस आणले आहेत. यातील बलात्कारांच्या गुन्ह्यांत आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिवसेनेचा मीरा-भार्इंदर शहर उपजिल्हाप्रमुख वासुदेव नांबियार याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यातील राजकारणात चर्चा सुरू झाली होती. विनयभंगाचे ८१ गुन्हे घडले असून त्यातील ८० गुन्हे उघडकीस आणून आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. या प्रकरणी शहरातील ५ पैकी ४ पोलीस ठाण्यांत १३ गुन्हे दाखल झाले असून त्यात काशिमीरा पोलीस ठाण्यात ४, मीरा रोडमधील ६, नवघरमधील २ व भार्इंदरमधील १ गुन्ह्याचा समावेश आहे. सोनसाखळी चोरट्यांवर सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला असल्याने सोनसाखळीचोरीचे उर्वरित ५० टक्के गुन्हेही लवकरच उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी लोकमतला सांगितले. सध्या राज्यभर गाजत असलेल्या मेथ ऊर्फ एमडी (मेफेड्रॉन) या मादक पदार्थाच्या बेकायदेशीर विक्रीचा प्रकार याच वर्षात उघडकीस आल्याने त्याचा मादक द्रव्यांच्या यादीत समावेश नसल्याने आरोपींवरील कारवाईत अडथळा येत आहे. परंतु, तो लवकरच त्या यादीत समाविष्ट करून त्याच्या विक्रीत गुंतलेल्यांना कठोर शिक्षा करण्यावर यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्यात आली होती.