Join us  

२०१९ ला अजित पवार गटाकडून आमदारांना परत आणणारी शरद पवारांची रणरागिणी मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 12:04 PM

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकारी सोनिया दुहान यांनी मुंबईत शरद पवारांच्या बैठकीला हजेरी लावली आहे

मुंबई – राज्याच्या राजकारणात शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले आहे. शरद पवारांच्या विचारांशी फारकत घेत प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासारखे नेते अजित पवार गटात सहभागी झाले आहे. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर आज दोन्ही गटाकडून बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार समर्थकांचे शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्याचसोबत कुणाकडे किती आमदार हे चित्रही स्पष्ट होईल. राष्ट्रवादीतील या घडामोडीत शरद पवारांची रणरागिणी जिनं २०१९ मध्ये राष्ट्रवादी आमदारांची सुटका केली होती ती मुंबईत दाखल झाली आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकारी सोनिया दुहान यांनी मुंबईत शरद पवारांच्या बैठकीला हजेरी लावली आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सोनिया दुहान म्हणाल्या की, पक्षात गटतटाची गोष्ट नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. हा पक्ष पवारांचा आहे. राष्ट्रीय असो वा सलंग्न संघटना सर्व शरद पवारांसोबत आहे. त्यामुळे गट वैगेरे याला अर्थ नाही असंही त्यांनी सांगितले.

त्याचसोबत २०१९ ला मी काही आमदारांना पुन्हा आणले होते. ती हिंमत आम्हाला शरद पवारांनीच दिली होती. तो पवारांचा चेकमेट होता. शरद पवार मात देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हा प्रसंग पहिल्यांदा आला नाही. अनेकदा असे प्रसंग आलेत. या प्रसंगालाही शरद पवार मात देतील. आता त्यांनी डाव खेळला आहे. अजून आम्हाला खेळायचा आहे. माझ्याकडे नंबर आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही. खाणारे दात दाखवा, दाखवणारे नको असं आव्हानही सोनिया दुहान यांनी अजित पवार गटाला दिले आहे.

कोण आहे सोनिया दुहान?

सोनिया दुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी या आमदारांची सुटका करण्यासाठी सोनिया दुहान यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांची सुखरुप सुटका करण्याची जबाबदारी सोनिया दुहान आणि कार्यकर्त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. सध्या प्रफुल पटेल हे अजित पवार गटात गेल्याने शरद पवारांनी सोनिया दुहान यांना दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार