Join us

सोनिया गांधींकडून गुरुदास कामत यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

By admin | Published: June 08, 2016 12:18 PM

राजकारणातून संन्यास घेणारे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांच्याशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चर्चा केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 08 - राजकारणातून संन्यास घेणारे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांच्याशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चर्चा केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी गुरुदास कामत यांच्याशी चर्चा करुन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुदास कामत यांनी काही दिवसांपुर्वी अचानक राजकीय संन्यासाची घोषणा केली होती ज्यामुळे काँग्रेसला धक्का बसला होता. 
 
गुरुदास कामत यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती. महत्वाचं म्हणजे गुरुदास कामत यांचे मुंबई काँग्रेसमधील समर्थक पक्षावर नाराज असून, कामत यांच्या समर्थनासाठी २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो. यामुळे गुरुदास कामत यांची नाराजी दूर करुन पुन्हा त्यांना परत आणण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून केला जात आहे.  
 
 
पाच वेळा खासदार राहिलेले कामत यांनी १० दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. तशा आशयाचे पत्र त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविले होते. त्याचे काहीही उत्तर न आल्याने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय त्यांना कळविला असल्याचे कामत यांनी म्हटले होते. मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्षे गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांचे प्रभावी गट कार्यरत होते. सध्याचे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम आणि कामत यांच्यातील मतभेदही समोर आले आहेत. मध्यंतरी निरुपम यांना हटविणार असल्याच्या बातम्या होत्या; पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई भेटीत निरुपम यांना अभय दिले होते. त्यामुळे नाराज झालेले कामत गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून लांबच होते.
 
 
गुरुदास कामत  गेल्या कित्येक वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून ते खासदार म्हणून १९८४ साली निवडून गेले. त्यानंतर सलग पाच वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांनी यूपीएच्या काळात राज्यमंत्री पद भूषविले होते. तसेच मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते.