गोरखपूर - लिंग बदलाच्या आधारावर पूर्वेत्तर रेल्वेच्या इज्जतनगर मंडलात कार्यरत असलेले राजेशकुमार आता गोरखपूरमध्ये सोनिया पांडे या नावाने नोकरी करत आहेत. महिला होण्यासाठीची न्यायालयीन लढाई सोनिया यांनी 27 महिने लढली आहे. प्रमुख कारखाना व्यवस्थापकाने 4 मार्च 2020 रेल्वेच्या अभिलेखात लिंग व नामांतराचा आदेश जारी केला. त्यामुळे, राजेशचे सोनिया असे नामांतर झाला. आता, लवकरच लग्नबंधनात अडकण्याचा विचार असल्याचे सोनियाने म्हटले आहे.
राजेश उर्फ सोनिया पांडे यांचे वडिल रेल्वेत कर्मचारी होते, सन 2013 मध्ये वडिलांच्या निधनानंतर वारसा हक्काने राजेशला रेल्वेत नोकरी मिळाली. मात्र, 2012 सालीच राजेशचा विरोध असतानाही त्याचं लग्न करण्यात आलं होतं. माझ्या शरीरात महिलांसारखे बदल जाणवत होते, त्यामुळे मी सुरुवातीला त्रस्त झाले होते. मात्र, लिंगबदल करण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत पतीलाही सांगून वेगळं होण्याचा निर्णयही झाल्याचे राजेश उर्फ सोनियाने सांगितले आहे.
सोनियाने लिंगबदल केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर आणि कायदेशीरदृट्या अडचणी येऊ लागल्या. कारण, तिच्या बँक अकाऊँट आणि आधार कार्डवर राजेश पांडे हेच नाव होतं. त्यामुळे, मोठ्या कसोशीच्या प्रयत्नानंतर आधार कार्डमधील नावात बदल केला. मात्र, बँकेत पहिलंच आधार कार्ड लिंक असल्याने नवीन आधार कार्ड स्विकारण्यात आलं नाही. कारण, एकाच नावाने दोन फिंगर प्रींट घेतले जात नाहीत. प्रवासादरम्यानही अनेकदा अशा समस्या उद्भवल्या, कारण चेहरा स्त्रीचा होता आणि ओळखपत्रावर पुरुषाचा फोटो असायचा. त्यामुळे, नोकरीच्या दस्तावेजमध्ये नाव बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली. म्हणूनच, राजेशने सोनिया पांडे होण्याचा निर्णय घेतला.