लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी कार्यरत डॉ. सोनिया सेठी यांच्यावर आता प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेचे नेतृत्व त्या फेब्रुवारी २०१९ पासून करत असून, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
डॉ. सोनिया सेठी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेड बिझनेस स्कूल येथून मेजर प्रोग्राम मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर पदवी, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग या विषयांत डॉक्टरेट मिळवली आहे. त्या १९९४ बॅचच्या, भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकारी आहेत. महाराष्ट्र केडरमधील त्या प्रथम महिला अधिकारी आहेत. त्यांनी सिडकोच्या सहसंचालक, एमएसआरडीसीच्या सहव्यवस्थापकीय संचालक व व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना वांद्रे-वरळी सागरी महामार्ग कार्यान्वित करण्यात आला. सागरी महामार्ग विस्तार, जलवाहतूक, फ्लायओव्हर, रस्त्यांचे जाळे अशा प्रकल्पांची संरचना त्यांनी प्रभावीपणे केली. आयडीएफसीच्या सार्वजनिक खासगी भागीदारीचे व्हर्टिकलचे ३ वर्षे नेतृत्व करण्याकरिता त्यांची गुणवत्तेनुसार निवड झाली. इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिटिव्हचे नेतृत्व त्यांनी ३ वर्षे केले.
मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या १४ लाइन्स म्हणजे ३३७ किलोमीटर, रस्ते, पूल, फ्लायओव्हर अशा पायाभूत सेवासुविधा प्रकल्पांसह मुंबई महानगर प्रदेशातील ९ महापालिका, ९ नगर परिषदा, ४८ सेन्अस टाऊन, १ हजार ४२७ गावे; अशा क्षेत्राचे नागरी नियोजन, इतर विकासकामांसोबत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे त्या नेतृत्व करत आहेत.
.........................................................