सोनियाच्या ताटी... उजळल्या ज्योती...

By admin | Published: August 19, 2016 01:58 AM2016-08-19T01:58:46+5:302016-08-19T01:58:46+5:30

एकाच गुन्ह्याकरिता शिक्षा भोगत असलेल्या पाच बहिण-भावांनी गुरुवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन साजरे केले. बहिणींच्या डोळ््यांना अश्रूंचा महापूर आला आहे

Sonia's tattoos ... the bright light ... | सोनियाच्या ताटी... उजळल्या ज्योती...

सोनियाच्या ताटी... उजळल्या ज्योती...

Next

ठाणे : एकाच गुन्ह्याकरिता शिक्षा भोगत असलेल्या पाच बहिण-भावांनी गुरुवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन साजरे केले. बहिणींच्या डोळ््यांना अश्रूंचा महापूर आला आहे आणि भाऊरायाही गहिवरले आहेत, अशा अत्यंत ह्रद्य क्षणाचे साक्षीदार असलेला प्रत्येकजण डोळ््यांच्या ओल्या कडा टिपत होता... विशेष म्हणजे एका कैद्याची बहिण गोरेगावहून राखी आणि मिठाई घेऊन त्याचवेळी भावाला भेटण्याकरिता आली होती. मात्र ती बंदी नसल्याने तिची राखी भावापर्यंत पोहोचलीच नाही.
वेगवेगळ््या गुन्ह्यांकरिता कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पाच बहिण-भावाच्या रक्षाबंधन सोहळ््याकरिता कारागृहात छोटेखानी व्यासपीठ तयार केले होते. भाऊ पटापट येऊन पाटावर बसले. पाचही बहिणींनी तबकातील राख्या आपल्या भावांच्या मनगटावर बांधल्या. इतकावेळ रोखून ठेवलेला भावनावेग आता उसळी मारून कंठाशी दाटून आला. डोळ््यातून टपोरे अश्रू घळघळू लागले आणि त्यात भाऊरायाची मूर्ती विरघळू लागली. भाऊ देखील गहिवरले. ते बहिणीच्या खांद्यावर थोपटून किंवा तिला जवळ घेऊन तिची समजूत काढू लागले. त्या भावपूर्ण वातावरणातील स्फुंदण्यात आजूबाजूचे उपस्थित केव्हा समरस झाले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. अर्थात त्यामध्ये कारागृहाच्या अधीक्षकांसह, पत्रकार, छायाचित्रकार आणि सहकारी बंदी होते. जो तो डोळ््याच्या ओल्या कडा रुमालानं टिपत होता आणि दु:खाचे कढ दाबण्याचा प्रयत्न करीत होता.
वर्षानुवर्षे रक्षाबंधनाला आम्ही भेटत आहोत. आज शिक्षा भोगत नसतो तर हा सण आम्ही घरी अधिक उत्साहात व मोकळ््या वातावरणात साजरा केला असता अशा भावना त्या बहिण-भावांनी व्यक्त केल्या. एका बहिणीने आपल्या लाडक्या भावाची दृष्ट काढली. इडापिडा टळो म्हणत तिनं कपाळाच्या दोन्ही बाजूला कडाकडा बोटं मोडली. ज्या बंदींच्या बहिणी नाहीत किंवा त्या दूरवर रहात असल्याने येऊ शकत नाहीत ते रक्षाबंधनापासून विन्मुख राहू नये याकरिता विविध सामाजिक संस्थांच्या भगिनींनी येऊन उपस्थित ५०० बंदींना राख्या बांधल्या. मात्र हा कार्यक्रमही औपचारिक नव्हता. अनोळखी बहिणीकडून राखी बांधून घेताना काही बंदींना आपल्या दूरवरील बहिणीची आठवण हळवं करून गेली. या बंदीच्या बहिणी त्यांना राख्या बांधायला येऊ शकत नाही आणि नियमानुसार तशी तरतूदही नाही. आयुष्यात एक घोडचूक झाली. पण यापुढे तरी समाजात चांगला नागरिक म्हणून जगण्याच्या सदिच्छा दे हेच मागणं या बंदीनी या बहिणींकडे मागितले असेल, असे कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितले.
आजच्या दिवशी कुटुंबीयांची व विशेष करून बहिणीची खूप आठवण येत आहे. परंतु ती इथे येऊ शकत नाही. मी गेली चार वर्षे माझ्या बहिणीला पाहिले नाही, अशा शब्दांत अन्य एका बंदीनी खेद प्रकट केला. आम्ही गुन्हा केला म्हणून आज इथे आहोत. परंतु अशा सणासुदीला घरच्यांची होणारी आठवण, त्यांच्या दाटून येणाऱ्या आठवणी हे पाहिल्यावर आता पुन्हा कुठलाही गुन्हा करण्याची चूक करणार नाही असे तिसऱ्या बंदीने सांगितले. मनोरंजनाचे कार्यक्रम सुरु झाले. (प्रतिनिधी)

ठाणे कारागृहाबाहेर गोरेगावहून आपल्या भावाला राखी बांधायला मिळेल या आशेने आलेली बहिण बराचवेळ उभी होती. तिच्या हातात राखी आणि मिठाईचा बॉक्स होता. येणाऱ्याजाणाऱ्या पत्रकारांनाही ती आपली भावासोबत भेट घडवण्याची विनंती करीत होती. ‘वेड्या बहिणीची रे वेडी माया...’ या गीताचे सूर कानात खेळत असताना कारागृहातून बाहेर पडले तेव्हा खिन्न मनानं आणि जड पावलांनी ती घराकडं निघाली होती...

Web Title: Sonia's tattoos ... the bright light ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.