खर्च परवडत नसल्याने सोनोग्राफी बंद, जीटी व कामा रुग्णालय हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:12 AM2019-11-07T04:12:57+5:302019-11-07T04:13:18+5:30
रुग्णांचे हाल : अन्य रुग्णालयांचा आधार
मुंबई : गोकूळदास तेजपाल आणि कामा रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा बंद झाल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांपासून ही सेवा बंद असल्याने येथील रुग्णांना सेंट जॉर्ज रुग्णालय वा जे. जे. रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी जावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनांनी ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे सांगितले आहे.
कामा रुग्णालयात सोनोग्राफीचे मशीन बंद असल्यामुळे ही सेवा बंद आहे, तर गोकूळदास तेजपाल रुग्णालयात म्हणजेच जीटी रुग्णालयात ही सेवा बंद करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात राज्याच्या कानाकोपऱ्यात रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयांवर रुग्णसेवेचा ताण असतो, अशा स्थितीत सोनोग्राफीची सेवा बंद झाल्यामुळे रुग्णांना याचा फटका सहन करावा लागत आहे. बरेच रुग्ण खासगी प्रयोगशाळेत वा जे.जे. सेंट जॉर्ज रुग्णालयात सोनोग्राफीसाठी जात असल्याचे दिसत आहे. कांदिवली येथील नारायण साळवे या रुग्णाच्या नातेवाइकांनी माहिती देताना सांगितले की, जी.टी. रुग्णालयातील डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले होते. रुग्णालयात सेवा बंद असल्याने खासगी प्रयोगशाळेत ही चाचणी करावी लागली, त्या ठिकाणी ही चाचणी करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले. काळाचौकीच्या मीनल सोलंकी यांनी सांगितले की, कामा रुग्णालयातून सेंट जॉर्ज रुग्णालयात सोनोग्राफीसाठी गेले. मात्र, तिथे कित्येक दिवसानंतर चाचणीकरिता बोलावले. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर सोनोग्राफी केली़ या सगळ्यामुळे मनस्ताप झाला.
याविषयी, कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमिता जोशी यांनी सांगितले की, सध्या कार्यरत असलेल्या सोनोग्राफी मशीनमधील एक भाग खराब झाला आहे. हा भाग खूप महाग असल्याने त्याची उपलब्धता नाही आहे. त्यामुळे महिनाभर ही सोनोग्राफी सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, परंतु कामा रुग्णालयात सोनोग्राफीकरिता येणाºया रुग्णांना चाचणीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात ही सेवा मिळत आहे. मशीन दुरुस्तीबाबत प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच ही सोनोग्राफी मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
जी.टी. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत शिनगारे यांनी सांगितले की, सोनोग्राफी मशीनमधील एक भाग जुना झाल्याने, तो बदलण्याची गरज आहे. हा भाग मिळाला नसल्याने सोनोग्राफी सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. नवीन मशीन खरेदीसाठी प्रचंड खर्च असल्याने हाफकिनला याबाबत लेखी पत्र पाठविले आहे, पण अजून सोनोग्राफी मशीन उपलब्ध झालेली नाही, पण काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सोनोग्राफी मशीन रुग्णालयाला दान करण्यात येणार आहेत. या संदर्भात प्रक्रिया सुरू असून लवकरच कार्यवाही केली जाईल. सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले की, जी.टी. आणि कामा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बंद आहे. या प्रकरणी आता बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढण्यात येईल, परंतु तोपर्यंत रुग्णालयात येणाºया रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेंट जॉर्ज रुग्णालयात सोनोग्राफीसाठी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.