सोनू.. तुझा डेंटिस्टवर भरोसा नाय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:09 AM2017-08-01T03:09:11+5:302017-08-01T03:09:11+5:30
सोशल मीडियावर ‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. अगदी मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी अशा विविध भाषांतील सोनूचे व्हर्जन्स सध्या नेटिझन्सच्या पसंतीस पडत आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर ‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. अगदी मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी अशा विविध भाषांतील सोनूचे व्हर्जन्स सध्या नेटिझन्सच्या पसंतीस पडत आहेत. आता मात्र या ‘सोनू...’फिव्हरचा उपयोग करून लहान मुलांच्या मनातील डेंटिस्टची भीती घालविणारे गाणे युट्यूबवर दाखल झाले आहे. त्यामुळे आता ‘सोनू... तुझा डेंटिस्टवर भरोसा नाय काय’ हे व्हर्जन नक्की लहानग्यांना वेड लावेल.
या नव्या व्हर्जनमध्ये डेंटिस्टकडे उपचारास यायला घाबरणा-या लहानग्यांना गाण्याच्या चालीत समजाविण्यात आले आहे. डेंटिस्ट हळुवारपणे उपचार करून तुमच्या दातांचे दुखणे सहज थांबवितात, असेही गाण्यात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाण्यात खुद्द डॉक्टर्स मंडळीच हे सर्व ‘सोनू’च्या माध्यमातून सांगत आहे. दात किंवा दाढ दुखायला लागली की रडत रडत डॉक्टरकडे जायचे नाही म्हणणारी चिमुरडी मंडळी हे गाणे पाहून नक्कीच विश्वासाने डेंटिस्टकडे उपचारास येतील असा विश्वास या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.
मूळ लोकगीत असणारे हे गीत सोशल मीडियावर गाजते आहे. या गाण्याच्या चालीत आरजे मलिष्काने केलेल्या ‘मुंबय.. तुमचा बीएमसीवर भरोसा नाय काय?’ या गाण्याने वादंग उठविला होता. या गाण्याची अनेकानेक व्हर्जन्स येत आहेत. यातील काही व्हर्जन्स सामाजिक संदेश देणारीही आहेत.