'बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं,' यावर सोनू निगमनं 'असं' दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 08:51 PM2019-01-17T20:51:09+5:302019-01-17T21:17:54+5:30
बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं, या निलेश राणेंच्या आरोपावर गायक सोनू निगमनं प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईः बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं, या निलेश राणेंच्या आरोपावर गायक सोनू निगमनं प्रतिक्रिया दिली आहे. सोनू निगमला ठार मारायचं होतं बाळासाहेबांना. अनेकवेळा सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना (सोनू निगम) विचारा, आज ते सांगतीलही, असं निलेश राणे म्हणाले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात सोनू निगमला यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सोनू निगमनं कोणतंही उत्तर दिलं नाही. सोनू निगमने चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचे हावभाव आणत प्रश्न विचारणाऱ्या त्या पत्रकाराकडे बघितलं आणि त्यानंतर एक स्मित हास्यदेखील दिलं. त्यामुळे सोनू निगमचं नेमकं उत्तर काय, या प्रश्नानं पत्रकारच बुचकळ्यात पडले आहेत.
निलेश राणेंनी काय केले होते आरोप?
सोनू निगमला ठार मारायचं होतं बाळासाहेबांना. अनेकवेळा सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना (सोनू निगम) विचारा, आज ते सांगतीलही. घाबरले असतील, मात्र, आज बाळासाहेब नाहीत, तर सांगतीलही. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसैनिक गेले होते. काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं, हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल, जाहीर सभेमध्ये सांगेन.
बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणा-कुणाचे मृत्यू झाले? कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर? हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही. राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणेसाहेब कधीही बोलले नाहीत. बाळासाहेबांनी केलं, त्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. पण आमच्या राणेसाहेबांचा मानसन्मान कुणी ठेवायचा? बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होतं. आम्हाला काही फरक पडत नव्हता. पण असे गल्लीबोळातले गटरछाप (विनायक राऊत) बोलायला लागले, तर आम्ही गप्प बसायचं?