सोनू सूदने पुन्हा शब्द पाळला, पुण्याच्या 'वॉरीयर आजीचं' ट्रेनिंग सेंटर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 08:11 AM2020-08-17T08:11:05+5:302020-08-17T08:12:18+5:30
सोनूने काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये एक वयोवृद्ध आजीबाई पोटाची खळगी भरण्यासाठी भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना दिसत होत्या
मुंबई - अभिनेता सोनू सूदने गेल्या काही महिन्यांपासून हजारो प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन काळात मुंबईतून परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं काम अजूनही सुरूच आहे. त्यातच, आता प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे. प्रवासी मजूरांच्या मदतीपासून सुरू झालेलं त्याचं काम दिवसेंदिवस वाढतच आहे. सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत, वृद्ध आजीबाईंना ऑफरच देऊ केली होती. महिलांना स्व-संरक्षणाची ट्रेनिंग देण्याचा विचार सोनूने केला होता. आता, लवकरच सोनून दिलेला हा शब्द सत्यात उतरत आहे.
सोनूने काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये एक वयोवृद्ध आजीबाई पोटाची खळगी भरण्यासाठी भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना दिसत होत्या. या आजीबाईचा व्हिडिओ पाहून सोनूला चांगली आयडिया सूचली. आजीबाईंना घेऊन मी महिलांसाठी, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे ट्रेनिंग देणारे स्कुल सुरू करु इच्छित आहे. कुणी मला या आजीबाई व त्यांच्या संपर्काबद्दल माहिती देता का, असे सोनूने म्हटले आहे. सोशल मीडियावर या वॉरीयर आजीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर, जगभरातून आजींना मदत मिळाली. विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आजीची भेट घेऊन साडी चोळीचा अहेर करत 1 लाख रुपयांची मदत केली होती.
Video: क्या बात है... पोट भरण्यासाठी रस्त्यावर काठी फिरवणाऱ्या आजीबाईंना सोनूकडून ऑफर
रविवारी निर्मिती परिवारातील सदस्यांनी #Warrior_aaji यांची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरू करण्याचे स्वप्न "निर्मिती फाऊंडेशन" येणाऱ्या बावीस ऑगस्टला सत्यात उतरवत आहे. सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे, अशी माहिती निर्मित्ती फाऊंडेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. त्यामध्ये, सोनू सूदचा विशेष उल्लेख या युवकांनी केला आहे. समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलेल्या सोनू सूदने आपल्या कामातून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकत आहे. त्यात, आजीबाईंना दिलेल्या या ऑफरनंतर शब्द पाळल्यामुळे सोनू सूद आणखी मराठी जनांच्या मनात बसला आहे.