Join us

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी सोनू सूद मातोश्रीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 10:58 PM

आज रात्री सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर धाव घेतली. यावेळी त्याच्यासोबत मंत्री अस्लम शेख हे उपस्थिती होते.

मुंबई - लॉकडाऊनदरम्यान आपल्या गावी परतत असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी पुढे आल्याने अभिनेता सोनू सूद चर्चेत आला आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सामनातील लेखामधून सोनूकडून सुरू असलेल्या समाजकार्याबाबत शंका उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, आज रात्री सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर धाव घेतली. यावेळी त्याच्यासोबत मंत्री अस्लम शेख हे उपस्थिती होते.

स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी पाठविण्याच्या कामात अभिनेता सूद यांनी हिरिरीने पुढाकार घेतला होता. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुकही होत होते. स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही सूद यांना राजभवनावरून बोलावून सूद यांचे कौतुकही केले होते. मात्र रविवारी शिवसेना सेने खासदार संजय राऊत यांनी सूद यांच्यावर टीका करणारा लेख शिवसेनेच्या मुखपत्रात छापला होता. राऊत यांच्या भूमिकेमुळे राजकीय वादंगाला सुरूवात झाली होती.मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनीही सूद यांची बाजू मांडत याविषयावर राजकारण न करण्याचे आवाहन केले. तर स्वतः  सूद यांनी टि्वट करत आपली भूमिका मांडली. "स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं" असे टि्वट सूद यांनी केले. त्यानंतर मातोश्री येथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

 दरम्यान सोनू सूद मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विटवरून दिली आहे. ''अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले. जय महाराष्ट्र,'' असा टोला संजय राऊन यांनी ट्विटरवरून लगावला आहे.   

मातोश्रीवर गेल्यानंतर सोनू सूद आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काही वेळ चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. 

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज रोखठोकमधील लेखामधून सोनू सूदवर जोरदार टीका केली होती. 

मुंबई - ‘लॉक डाऊन’ काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाब्बासकी दिली. महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची फार मोठी परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले ते बाबा आमटे. या नावांत आता आणखी एका महान सामाजिक कार्यकर्त्याचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे सोनू सूद! अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून टोला हाणला होता.

तसेच ‘लॉक डाऊन’च्या काळात सोनू सूदने जे केले ते बहुधा केंद्र, राज्य सरकारलाही जमले नाही. मागचे पंधरा दिवस तो घाम गाळत, उन्हातान्हात रस्त्यावर वावरताना दिसला. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, दिल्ली येथे जाऊ पाहणाऱ्या लाखो मजुरांसाठी सोनू सूद म्हणजे देवदूताप्रमाणे अवतरला. त्याने हजारो मजुरांना अलगद आपल्या घरी सुरक्षित पोहोचवले. गावी निघालेल्या मजुरांना कृतार्थ भावाने निरोप देताना सोनूची छायाचित्रे व व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहोचवण्यात अपयशी ठरले, पण सोनू सूदसारखे नवे महात्मा किती सहजतेने मजुरांना मदत करीत आहेत, असा प्रचार समाजमाध्यमांतून सुरू झाला. सोनू सूदने केलेल्या या कार्याची दखल महाराष्ट्राच्या राज्यपालांना घ्यावी लागली व सोनूला चहापानासाठी राजभवनाचे निमंत्रण आले. हे सोनू प्रकरण नक्की काय आहे? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता.

टॅग्स :सोनू सूदउद्धव ठाकरेशिवसेना