'मला काहीही फरक पडत नाही पण...'; वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास रोखल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 07:54 AM2020-06-09T07:54:02+5:302020-06-09T08:11:34+5:30
काही मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. या सर्व मजुरांना निरोप देण्यासाठी सोनू सूद वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहचला होता.
मुंबई: लॉकडाऊनदरम्यान आपल्या गावी परतत असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी पुढे आल्याने अभिनेता सोनू सूद चर्चेत आला आहे. आतापर्यंत हजारो परप्रांतीय मजुरांना, कामगारांना सोनू सूदने त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे.
सोनू सूदने सोमवारी देखील काही मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. या सर्व मजुरांना निरोप देण्यासाठी सोनू सूद वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहचला होता. मात्र यावेळी स्थानकावरील आरपीएफकडून सोनू सूदला प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. सोनू सूदला रोखल्यानंतर उलट सुटल चर्चा रंगू लागल्या आहेत. पंरतु या सर्व प्रकरणावर स्वत: सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे.
सोनू सूदला वांद्रे टर्मिनसमधून बाहेर पडल्यावर प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी का मिळाली नाही याबाबत विचारण्यात आलं. यावर सोनू सूद म्हणाला की, मला काहीही फरक पडत नाही. पण पोलिसांनी परवानगी दिली असती तर चांगलच झालं असतं. माझं काम मजुरांना त्यांच्या घरी पोहचवणे आहे. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असं सोनू सूदने सांगितले.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत सोनू सूदला विचारलं असता, सोनू सूदने उत्तर देणं टाळलं. मजुर आणि कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळत आहे. या सर्वांचा मी आभारी असल्याचे सोनू सूदने सांगितले.
सोनू सूदने परंप्रांतीय मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांची उत्तर प्रदेशच्या आजमगड येथे जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली होती. त्यामुळे सोनू सूद स्वत: या सर्वांना निरोप देण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आला होता. मात्र त्याला प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखण्यात आले. सोनू सूदने जवळपास 45 मिनिट वांद्रे टर्मिनस येथील आरपीएफच्या ऑफिसमध्ये बसून पोलिसांशी चर्चा करत होता. मात्र तरीही पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने सोनू सूदने माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी पाठविण्याच्या कामात अभिनेता सूद यांनी हिरिरीने पुढाकार घेतला होता. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुकही होत होते. स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही सूद यांना राजभवनावरून बोलावून सूद यांचे कौतुकही केले होते. मात्र संजय राऊत यांनी सूद यांच्यावर टीका करणारा लेख शिवसेनेच्या मुखपत्रात छापला होता. राऊत यांच्या भूमिकेमुळे राजकीय वादंगाला सुरूवात झाली होती. यानंतर सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.