पालिकेने सादर केले प्रतिज्ञापत्र
सोनू सूदला अनधिकृत बांधकाम करण्याची सवय
पालिकेने सादर केले प्रतिज्ञापत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला अनधिकृत बांधकाम करण्याची सवय आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करूनही त्याने पालिकेकडून परवानगी न घेता व्यावसायिक फायद्यासाठी पुन्हा बांधकाम सुरू केले, असे मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सोनू सूद याच्या जुहू येथील इमारतीमधील बांधकामात बेकायदेशीररीत्या बदल केल्याने व पालिकेच्या परवानगीशिवाय फ्लॅटचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्याने पालिकेने सूदला दोन नोटीस बजावल्या. त्याविराधात सूदने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. मात्र, दिवाणी न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत सूदला अंतरिम दिलासा दिला. ज्येष्ठ वकील अनिल साखरे व जोएल कार्लोस न्यायालयात पालिकेची बाजू मांडत आहेत.
सोनू सूद यांच्या इमारतीची पाहणी सप्टेंबर २०१८ मध्ये केली. त्याच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने त्याला तात्काळ काम थांबविण्यासंबंधी नोटीस बजावली. नोटीसचा कालावधी संपला नसतानाही सूदने बांधकाम सुरू ठेवले. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये या बांधकामावर कारवाई केली. त्या कारवाईनंतरही सूदने पुन्हा बांधकाम केले. त्यामुळे सूद याला अनधिकृत बांधकाम करण्याची सवय आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करूनही त्याने पालिकेकडून परवानगी न घेता व्यावसायिक फायद्यासाठी पुन्हा बांधकाम सुरू केले, असे मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
पालिकेच्या करवाईवर स्थगिती दिली, तर हा हॉटेलमध्ये निवास करणाऱ्या लोकांचे आयुष्य धोक्यात येईल आणि सूदने बेकायदेशीररीत्या त्याचा व्यवसाय सुरू ठेवला. त्यामुळे त्याची याचिका फेटाळावी, असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी आहे.
.............................