मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई व लखनौतील कार्यालय व घराची आयकर विभागाकडून गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही झडती घेण्यात आली. बुधवारी २० तास तपासणी केल्यानंतर ‘आयटी’चे पथक गुरुवारी सकाळी पुन्हा त्यांच्या जुहू येथील कार्यालय व लोखंडवाला येथील घरी पोहोचले. मात्र आतापर्यंत केलेल्या तपासणीबद्दल त्यांच्याकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
विविध सामाजिक कार्यासाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे स्रोत जाणण्यासाठी संबंधित कागदपत्रे व दस्तावेजाची छाननी केली जात असल्याचे समजते. सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. ‘आप’च्या माध्यमातून त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयकर विभागाच्या आजच्या तपासणी मोहिमेमागे राजकीय कारवाईचा वास असल्याची चर्चा रंगली आहे.
आयकर विभागाच्या सहा स्वतंत्र पथकाकडून बुधवारी सकाळपासून कारवाईला प्रारंभ करण्यात आला. लोखंडवाला येथील सहाव्या मजल्यावरील निवासस्थान, जुहूतील कार्यालय व हॉटेल तसेच लखनौमधील कार्यालयात पोहचून तपासणी सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून विविध बँक खाती, त्यावरील व्यवहार व दस्तावेजाची तपासणी करण्यात आली. सुमारे २० तासानंतर पथक परतले होते. यावेळी सोनू सूद व त्याचे कुटुंबीय ओशिवरा येथील घरी उपस्थित होते.
गुरुवारी सकाळी आयकर विभागाचे अधिकारी पुन्हा त्याच्या घरी पोहचले. त्यांनी कार्यालयातील स्टाफकडून सोनूच्या कंपनीची कागदपत्रे व अन्य व्यवहाराच्या दस्तावेज ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून झडती सुरू होती. मात्र त्याबाबत काहीही माहिती देण्यास अधिकाऱ्याकडून नकार देण्यात आला.