अदानी समूहाने मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन हाती घेताच अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांत फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:06 AM2021-07-19T04:06:16+5:302021-07-19T04:06:16+5:30
मुंबई : अदानी समूहाने मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन हाती घेताच आपल्या अखत्यारितील सर्व विमानतळांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांत फेरबदल केले आहेत. ...
मुंबई : अदानी समूहाने मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन हाती घेताच आपल्या अखत्यारितील सर्व विमानतळांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांत फेरबदल केले आहेत. मुंबई विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आर. के. जैन यांना अदानी समूहाच्या विमानतळ विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद देण्यात आले आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची स्थापना (२ मार्च २००६) झाल्यापासून जैन यांनी या विमानतळाशी संबंधित विविध पदे भूषविली आहेत. विमानतळालगत असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. जैन यांनी बेहनद झांडी यांच्याकडून पदभार स्वीकारला, तर झांडी यांच्याकडे नॉन एरोनॉटिकल व्यवसायाच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. जैन यांच्याजागी प्रकाश तुळसानी हे मुंबई विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. यापूर्वी ऑल कार्गो लॉजिस्टिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले तुळसानी काही महिन्यांपूर्वी अदानी समूहाच्या विमानतळ विभागात सामील झाले होते. त्यांच्याकडे कार्गो ऑपरेशनचे प्रभारीपद देण्यात आले होते.
कॅप्टन बी. व्ही. जे. के शर्मा हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. शर्मा पूर्वी अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्रातील बंदरांचे संचालक होते. कृष्णपट्टनम बंदराचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गांधी यांच्याकडे अहमदाबाद विमानतळाचे मुख्य विमानतळ अधिकारीपद देण्यात आले आहे. मुंबई विमानतळावरील ऑपरेशन प्रमुख प्रभात महापात्रा हे आता अदानी समूहाकडील सर्व गट विमानतळांवरील ऑपरेशन्स हाताळतील. दहेज बंदराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कटार हे मुंबई विमानतळावर महापात्रा यांची जागा घेतील.
मंगळुरू आणि जयपूर विमानतळाचे मुख्य विमानतळ अधिकारी म्हणून नीरव शहा आणि विष्णू झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर ग्राहक सेवा अधिकारी असलेल्या रेखा नायर यांच्याकडे सर्व विमानतळांवरील ग्राहक सेवा आणि गुणवत्तेसंबंधी जबाबदारी देण्यात आली आहे.
.......
नवी मुंबई विमानतळ २०२४ पर्यंत पूर्ण करणार
अदानी समूहाकडे मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचे कामही हस्तांतरित झाले आहे. पुढील महिन्यापासून पूर्ण क्षमतेने काम सुरू केले जाईल. २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.