लवकरच ठरणार ‘सरपंच ऑफ द ईअर, ‘लोकमत’ समूहाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:20 AM2020-01-05T05:20:18+5:302020-01-05T05:21:48+5:30
राज्यात ‘सरपंच ऑफ द इअर’चा मुकूट कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार याची उत्सुकता लवकरच संपणार आहे.
मुंबई : राज्यात ‘सरपंच ऑफ द इअर’चा मुकूट कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार याची उत्सुकता लवकरच संपणार आहे. ‘लोकमत’च्या ‘सरपंच ऑफ द ईअर’ पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार असून, मुंबईत मंत्र्यांच्या हस्ते भव्य सोहळ्यात गावाची शान असलेल्या सरपंचांना हा बहुमान देऊन गौरविण्यात येणार आहे.
‘लोकमत’ समूहाने उत्कृष्ट संसदपटू तसेच विधानमंडळातील सदस्यांसाठी नावीण्यपूर्ण पुरस्कार सुरू केले आहेत. त्याच धर्तीवर गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांनाही ‘लोकमत’ समूहातर्फे गौरविण्यात येते़ वैयक्तिक सरपंचांसाठी राज्यस्तरावर कुठलीही पुरस्कार योजना नव्हती. ती गरज पूर्ण करण्यासाठी गत दोन वर्षांपासून ‘लोकमत’ हा उपक्रम राबवत आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. पहिल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर दुसºया वर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा लवकरच आयोजित करण्यात येईल.
अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या १८ जिल्ह्यांमध्ये ही पुरस्कार योजना राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात या प्रत्येक जिल्ह्यात विविध प्रकारच्या तेरा पुरस्कारांनी सरपंचांना गौरविण्यात आले आहे़ त्या विजेत्यांमधून आता राज्यस्तरीय पुरस्कार दिले जाणार आहेत. गावातील जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा विभागात सरपंचांनी केलेले काम पाहून या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जातो.
याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द इअर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण तेरा पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. या ज्युरींमार्फत प्रत्येक नामांकनाची छाननी होऊन राज्यस्तरीय विजेत्यांवर मोहोर उमटवली जाईल.