बंद रेल्वे सुरू होताच गुन्ह्यांमध्ये झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:42 AM2020-12-19T01:42:24+5:302020-12-19T01:42:33+5:30
आठ महिन्यांत ५०० गुन्हे, १३७ गुन्ह्यांची उकल
मुंबई : लॉकडाऊन काळात बंद असलेली मुंबईतील लोकल सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. रेल्वे आणि रेल्वे परिसरातील गुन्ह्याची संख्याही वाढली आहे. आठ महिन्यांत ५०० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सर्वाधिक चोऱ्या, दरोडा आणि त्या पाठोपाठ विनयभंग, खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे घडले आहेत. नोव्हेंबर महिन्यात तर वाढ अधिक आहे. जवळपास १९८ गुन्हे दाखल झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली.
मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गावर सध्याच्या घडीला १२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. त्यांच्यासाठी ९० टक्क्यांहून अधिक लोकल फेऱ्या चालविल्या जात आहेत.
टाळेबंदी लागल्यानंतर एप्रिल महिन्यात पाच चोरी आणि हल्ला, मारहाणीची एक अशा एकूण सहा गुन्ह्य़ांची नोंद झाली होती.
मे महिन्यात विविध ९ गुन्हे दाखल झाले, तर जूून महिन्यात दुप्पट आणि जुलै महिन्यात ३७ गुन्हे दाखल झाले. त्यानंतर, गुन्ह्य़ांत वाढ होत गेली.
सध्या लोकलमधून अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि सर्वच महिलांना लोकल प्रवासाची मुभा आहे.तरीही एवढे गुन्हे घडले आहेत.
५०० पैकी ३६५ चोरीचे गुन्हे
गेल्या आठ महिन्यांत विविध ५०० गुन्ह्य़ांची नोंद होतानाच, यातील १३७ गुन्ह्य़ांचा यशस्वीरीत्या तपास करण्यात आला आहे. घडलेल्या गुन्ह्य़ांत मोबाइल, पाकीट, चैन, बॅग यांसह विविध चोरीचे एकूण ३६५, त्यानंतर मुंबई हद्दीत दरोड्याचे ८२ गुन्हे आहेत.
रेल्वेत गुन्हे जास्त
रेल्वे आणि रेल्वे परिसर यामध्ये सर्वाधिक गुन्हे लोकलमध्ये घडले आहेत. गेल्या आठ महिन्यांत चालू गाडीत २५२ गुन्हे घडले आहेत, तर रेल्वे परिसर हद्दीत २४८ गुन्हे घडले आहेत. नोव्हेंबर महिन्यात चालू गाडीत जास्त गुन्हे घडले असून, १०६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
महिना दाखल गुन्हे यशस्वी तपास
एप्रिल ६ १
मे ९ १
जून १८ १
जुलै ३७ ५
ऑगस्ट ५८ १९
सप्टेंबर ६३ १९
ऑक्टोबर १११ ३८
नोव्हेंबर १९८ ५३