लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरात दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाल्यानंतर मजूर आणि कामगारवर्गाने पुन्हा गावाकडची वाट धरली. मात्र, कोरोनाचा जोर ओसरताच त्यांनी रोजगाराच्या अपेक्षेने पुन्हा मुंबईकडे प्रयाण सुरू केले आहे. जून आणि जुलै महिन्यांत जवळपास २८ लाखांहून अधिक मजूर मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा मुंबईला बसला. त्यामुळे रुग्णसंख्येचा वेग रोखण्यासाठी एप्रिलमध्ये पुन्हा कठोर निर्बंध लागू करावे लागले. परिणामी, हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली. कोरोनाचा जोर वाढतच राहिल्यास पहिल्या लॉकडाऊप्रमाणे हाल होतील, या भीतीने त्यांनी आधीच गावाची वाट धरली. दुसऱ्या लाटेत मुंबई महानगर परिसरातून जवळपास ६० लाखांहून अधिक मजूर स्थलांतरित झाले. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर निर्बंध शिथिल केल्यामुळे २८ लाखांहून अधिक मजूर पुन्हा मुंबईत परतल्याची माहिती कामगार विभागाशी संबंधित सूत्रांनी दिली.
परराज्यांतून किती मजूर परतले?
- दुसऱ्या लाटेचा जोर ओसरताच उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून २८ लाखांहून अधिक मजूर मुंबईत परतले आहेत.
- त्यापैकी ७८ हजार ९५६ मजूर पश्चिम रेल्वेद्वारे मे आणि जून महिन्यांत दाखल झाले.
- राज्याचा विचार करता दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे स्थलांतरित झालेले २८ लाख २६ हजार २२६ कामगार रेल्वेद्वारे दाखल होत पुन्हा कामावर हजर झाले आहेत.
.........
सर्वाधिक स्थलांतर कुठे झाले?
एप्रिलमध्ये निर्बंध कठोर केल्यानंतर उत्तर प्रदेशात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. त्यापाठोपाठ बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मजुरांनी स्थलांतर केले. त्याशिवाय ओडिशा, झारखंड, मध्यप्रदेश आणि दक्षिणेकडील राज्यांत परतणाऱ्या मजुरांची संख्याही लक्षणीय होती.
..........
परदेशात किती जण गेले?
दुसऱ्या लाटेचा जोर ओसरताच जवळपास १,४०० नागरिक नोकरी वा शिक्षणानिमित्त परदेशात स्थलांतरित झाले आहेत. आघाडीच्या देशांनी अद्याप भारतीयांवरील प्रवासबंदी शिथिल केली नसल्याने त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
........
माझी मुलगी उच्चशिक्षणासाठी सिंगापूरला गेली आहे. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी झाला नसल्याने चिंता लागून राहिली आहे.
-शिल्पा चिटणीस, पालक
....
युरोपातील एका आघाडीच्या शिपिंग कंपनीत मला नोकरी लागली आहे; परंतु लसीकरण पूर्ण न झाल्याने प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. येत्या शनिवारी दुसरा डोस घेतला की, तातडीने रवाना होईन.
-शरद श्रीवास्तव, नाविक