मैदानांबाबत लवकरच धोरण
By admin | Published: July 21, 2014 01:12 AM2014-07-21T01:12:15+5:302014-07-21T01:12:15+5:30
महापालिका क्षेत्रातील मैदानांविषयी प्रशासन लवकरच निश्चित धोरण राबवणार आहे.
नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील मैदानांविषयी प्रशासन लवकरच निश्चित धोरण राबवणार आहे. शाळेलगत असलेली मैदाने शाळांनी ताब्यात घेतली असल्याने नागरिकांना ती वापरासाठी उपलब्ध होत नाहीत. यासंदर्भात महासभेत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला असता मैदानांचे धोरण राबवण्यास प्रशासनाला भाग पडले आहे.
नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील शाळांलगतची मैदाने ही तेथील शाळांच्या ताब्यात आहेत. ही मैदाने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी स्थानिकांच्या वापरासाठी खुली असली पाहिजेत. मात्र अनेक खाजगी शाळांनी या मैदानांवर ताबा मिळवला असून नागरिकांना तिकडे फिरकूही दिले जात नाही. त्यामुळे मुलांना खैळासाठी मैदाने उपलब्ध होत नसून अनेक सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांचा देखील हिरमोड होत आहे.
शाळेच्या मैदानांव्यतिरिक्त इतर मैदाने वर्षातून ३० दिवस उपक्रमांसाठी वापराकरिता दिली जातात. मात्र ५ ते १२ दिवस चालणाऱ्या उत्सवांकरिता हा कालावधी अपुरा ठरत आहे. त्यामुळे विविध प्रदर्शने, महोत्सव यासारख्या कार्यक्रमांसाठी खेळाची मैदाने उपलब्ध करून द्यावीत यासंबंधीचा अशासकीय ठराव नगरसेवक विक्रम शिंदे यांनी महासभेपुढे मांडला.
त्यावर शनिवारी झालेल्या महासभेत चर्चा घडली. यावेळी शाळांची मैदाने मुलांच्या खेळासाठी खुली करणे काळाची गरज
असल्याचे मत नगरसेवक दशरथ भगत यांनी व्यक्त केले. तर पालिकेला सिडकोकडून हव्या असलेल्या भूखंडाची यादी द्या, ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे नगरसेवक तथा सिडको संचालक नामदेव भगत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)