भाजपमध्ये लवकरच पुनर्बदल; पराभवामुळे नाही, तर आगामी निवडणुकांची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 10:04 AM2023-03-08T10:04:22+5:302023-03-08T10:31:14+5:30
राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या शिक्षक मतदार आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही.
मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांता झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. सातत्याने विजयाची सवय लागलेल्या भाजप नेत्यांना हा पराभव पचवणे काहीसे कठीण बनले आहे. त्यामुळे, या पराभवाची चिकित्सा करताना आता आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा विजय हवा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य कार्यकारिणीत बदल केले जाणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंदर्भात माहिती दिली. विशेष म्हणजे अधिवेशनानंतर येत्या महिनाभरातच हे बदल केले जाणार आहेत.
राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या शिक्षक मतदार आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही. केवळ, कोकण पदवीधर मतदारसंघातच भाजप उमेदवाराचा विजय झाला. तर, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, नुकतेच झालेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीतही कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव झाला. त्याजागी महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी झाले. त्यामुळे, भाजपच्या रणनितीवर आणि बदलावर प्रश्चचिन्ह उभे होत आहे. त्यातच, आगामी काळात सर्वच निवडणुका महत्त्वाच्या असल्याने भाजपने राज्याच्या कार्यकारिणीत बदल करण्याचे ठरवले आहे. भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेरबदल करण्याचे ठरवले आहे. मात्र, हे फेरबदल पुढील निवडणुकांच्या अनुषंगाने असणार आहेत. कसबा पेठ निवडणुकीतील पराभवाचा या बदलाशी काहीही संबंध नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भाजपात महिनाभरात पुनर्रचना
'राज्यात या महिन्यात काही पुनर्रचना केल्या जाणार आहेत. मी सहा महिन्यांपूर्वी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर पुनर्रचना करण्याचा विचार होताच. पण राज्यभर प्रवास करून नंतर पुनर्रचना करावी असा विषय होता. काही ठिकाणी पुनर्रचना होईल, काही ठिकाणी नवे जिल्हाध्यक्ष येतील. काही ठिकाणी प्रदेशावर पुनर्रचना होईल. पण, येत्या महिना-दीड महिन्यात पुनर्रचना होईल', असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले.