बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग; अतिउत्साही नागरिकांना आवरताना प्रशासनाच्या आले नाकीनऊ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध सोमवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात शिथील करण्यात आले आणि सुमारे दीड महिन्यांनी मोकळीक मिळालेल्या नागरिकांनी रस्त्यांवर अक्षरश: गर्दी केली. बांद्यापासून चांद्यापर्यंत पसरलेल्या बाजारपेठा, सार्वजनिक वाहतुकीसह आवश्यक गाेष्टींच्या खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. या अतिउत्साही नागरिकांना आवरताना प्रशासनाच्या मात्र नाकीनऊ आले होते. सकाळपासून ऊन डोक्यावर येईपर्यंत रस्त्यांवर सैरावैरा भटकणाऱ्या नागरिकांचा उत्साह दुपारी २ नंतर मावळला, सायंकाळी पाचनंतर यात पुन्हा भर पडली.
स्तर तीनमध्ये असलेल्या मुंबई महापालिकेने अनलॉकनुसार मुंबईकरांना सोमवारी बऱ्यापैकी मोकळीक दिली. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत लालबागसारख्या मोठ्या बाजारपेठांसह गल्लीबोळातील बाजारपेठा खरेदी-विक्रीसाठी ओसांडून वाहत होत्या. महिलांची बाजारपेठांत झुंबड उडाली होती. रिक्षा, टॅक्सीसारखी पर्यायी वाहने ओव्हर फ्लो भरून वाहत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्गासह उर्वरित प्रमुख रस्ते रोजच्या तुलनेत सोमवारी भरभरून वाहत होते. ‘बेस्ट’मध्ये उभ्याने प्रवासाला परवानगी नसल्याने स्थानकांवर लाबंच लांब रांगा लागल्या हाेत्या.
दुसरीकडे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावत असलेल्या मेट्रोनेही आपल्या सेवेत ३० टक्क्यांची वाढ केल्याने मुंबईकर प्रवाशांना किंचित दिलासा मिळाला होता.
दरम्यान, मुंबई शहरासह उपनगरातील महत्त्वाच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे नाकाबंदी निदर्शनास आली. बाजारपेठांमध्ये पोलीस गस्त घालताना निदर्शनास आले. शिवाय मास्क लावणार नाहीत, अशांना दंड ठोठावण्यासाठी क्लीनअप मार्शलही बहुतांश ठिकाणी कार्यरत होते. जे प्रवासी मास्क परिधान करणार नाहीत; अशांना बेस्ट बसमधून खाली उतरवले जाईल, असा सज्जड दम वाहक देत असल्याचे चित्र होते.
..........................................................