' आई ' पर्यटन धोरणासाठी लवकरच विशेष कक्ष; अंमलबजावणीसाठी दहा कोटींचा निधी

By स्नेहा मोरे | Published: December 8, 2023 06:37 PM2023-12-08T18:37:17+5:302023-12-08T18:37:31+5:30

या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

Soon Special Chamber for 'Mother' Tourism Policy; 10 crore fund for implementation | ' आई ' पर्यटन धोरणासाठी लवकरच विशेष कक्ष; अंमलबजावणीसाठी दहा कोटींचा निधी

' आई ' पर्यटन धोरणासाठी लवकरच विशेष कक्ष; अंमलबजावणीसाठी दहा कोटींचा निधी

मुंबई - महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. याखेरीस, याकरीता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष तयार करण्यात येईल.

राज्यात लवकरच काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांच्या विविध योजनांशी समन्वय साधून राबविण्यात येईल, तसेच स्वतंत्र संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात येईल.

या धोरणात महिला उद्योजगता विकास, महिलांकरीता पायाभुत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास या पंचसुत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा याकरीता विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यदलाचीही स्थापना करण्यात येणार आहे. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १ ते ८ मार्च या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्स,युनिट्समध्ये सर्व महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये ५० टक्के सूट देण्यात येईल.

व्यवसाय उभारणीसाठी सहाय्य

राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या दहा पर्यटन व्यवसायांना व्यवसाय उभारणीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. या महिलांना बँकांमार्फत घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची १५ लाखापर्यंतच्या मर्यादेत व ७ वर्षे किंवा ४.५ लाखापर्यंतची मर्यादा यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत प्रतिपूर्ती करण्याकरीता योजना असेल. तसेच, पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिला टूर ऑपरेटरर्स यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली ५ वर्षे शासनामार्फत भरण्यात येणार आहे.

Web Title: Soon Special Chamber for 'Mother' Tourism Policy; 10 crore fund for implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.