लवकरच ७५ ठिकाणी नाट्यगृहे उभारणार - मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 09:24 AM2023-11-24T09:24:37+5:302023-11-24T09:25:06+5:30

सुधीर मुनगंटीवार : ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू

Soon theaters will be set up in 75 places - Mungantiwar | लवकरच ७५ ठिकाणी नाट्यगृहे उभारणार - मुनगंटीवार

लवकरच ७५ ठिकाणी नाट्यगृहे उभारणार - मुनगंटीवार

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर हे सांस्कृतिक कार्य विभागाचे एकमेव नाट्यगृह आहे. राज्यातील इतर सर्व नाट्यगृहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फे ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या उद्घाटनप्रसंगी दृकश्राव्य माध्यमातून मुनगंटीवार यांनी संवाद साधला. 

स्पर्धकांना दृक्श्राव्य माध्यमातून शुभेच्छा
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची नांदी झाली. मुंबई केंद्रावरील स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात गिरगावातील साहित्य संघ मंदिर येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, अभिनेते-दिग्दर्शक प्रमोद पवार, नाट्य अनुदान समिती सदस्या शैला सामंत, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य व अभिनेता मकरंद पाध्ये, अभिनेते आनंदा कारेकर, परीक्षक विनोद दुर्गपुरोहित, डॉ. समीर मोने, सुजाता गोडसे, तर यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, परीक्षक वसंत सामदेकर, ईश्वर जगताप, प्राची गडकरी उपस्थित होते. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज पूजन करण्यात आले. स्पर्धकांना दृकश्राव्य माध्यमातून शुभेच्छा देताना मुनगंटीवार यांनी पारितोषिकांच्या व परीक्षकांच्या मानधन वाढीबाबत विचाराधीन असल्याचे सांगितले.

६० संघांचे सादरीकरण
साहित्य संघ मंदिर येथे अभिनय साधना, मुंबई या संस्थेने ‘मामला गडबड है!’ तर यशवंत नाट्य मंदिर येथे इम्पल्स नाट्य संस्था, मुंबई या संस्थेने सादर केलेल्या ‘या वळणावर’ या नाटकाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात झाली. मुंबई केंद्रावरील प्राथमिक फेरीत यंदा ६० संघांचे सादरीकरण होणार असून, साहित्य संघ मंदिर आणि यशवंत नाट्य मंदिर येथे २८ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता एका नाटकांचे सादरीकरण होईल.

Web Title: Soon theaters will be set up in 75 places - Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.