Coronavirus : धारावीतून कोरोना हद्दपार होणार; केवळ पाच सक्रीय रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:42 PM2021-06-18T20:42:03+5:302021-06-18T20:43:11+5:30
Coronavirus In Mumbai : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात. धारावीतही रुग्ण संख्या कमी.
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. धारावीमध्ये तर गेल्या आठवड्याभरात दररोज सरासरी एक बाधित रुग्ण आढळून येत आहे. तर आता केवळ पाच सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोना रुपी संकट आशिया खंडातील या मोठ्या झोपडपट्टीमधून हद्दपार होण्याची चिन्हे आहेत.
दाटीवाटीने वसलेल्या धारावीत एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिल्या रुग्ण सापडला. सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याने येथे कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान पालिकेपुढे होते. मात्र एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेली ही झोपडपट्टी धारावी पॅटर्नमुळे मोकळा श्वास घेत आहे. दुसऱ्या लाटेत इमारतींमध्ये वाढलेली रुग्ण संख्याही आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
जास्तीतजास्त लोकांची चाचणी, बाधितांचे संपर्कातील लोकांना शोधणे, तात्काळ विलगीकरण आणि त्वरित उपचार या धारावी पॅटर्नने दुसऱ्या लाटेतही आपली कामगिरी फत्ते केली आहे. गेले तीन दिवस सलग धारावीत एकच बाधित रुग्ण सापडत आहे. तर अवघे पाच बाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.