Join us

पालिकेकडून लवकरच तिसऱ्या टप्प्यातील सिरो सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:08 AM

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने तिसरे सिरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ...

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने तिसरे सिरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने १२ हजार नागरिकांचे नमुने घेतले आहेत. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार किती झाला आहे, शिवाय किती नागरिकांच्या शरीरात प्रतिपिंडांची निर्मिती झाली आहे याची पडताळणी करण्यात येणार आहे.

मुंबईत सव्वातीन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती किती टक्के आहे याचा अभ्यास सिरो सर्वेक्षणातून करण्यात येतो. साधारण ६० ते ७० टक्के आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यानुसार जवळपास ८० ते ९० लाख व्यक्तींमध्ये प्रतिपिंड तयार झाले असण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून किमान ६० टक्क्यांपर्यंत हे प्रमाण पोहोचले आहे का, याची पडताळणी करण्यात येणार आहे.

याविषयी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून एखाद्या प्रभागात अधिक प्रभाव दिसल्यास तिथे सतर्कता आणखी वाढवली जाईल. त्याचप्रमाणे एखाद्या प्रभागांमध्ये अधिक संसर्ग आढळल्यास तर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण प्रक्रियेच्या सुरुवातीला या प्रभागाला प्राधान्य दिले जाईल, असा पालिका प्रशासनाचा विचार आहे.

अहवालांचा करण्यात येणार अभ्यास

प्रशासनातर्फे यापूर्वी करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणांमध्ये ८८७० आणि ६९३६ रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. एकाच प्रभागामध्ये दोन वेळा चाचण्या झाल्या होत्या. त्यावेळी गर्दीच्या तसेच, वर्दळीच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्ग होऊन गेल्याचे दिसून आले होते. आता तिसऱ्या सर्वेक्षणानंतर पहिल्या दोन सर्वेक्षणांमध्ये दिसून आलेल्या निष्कर्षांशी या अहवालांची तुलना करण्यात येणार आहे.