मुंबई : चारकोप मेट्रो डेपो येथे मेट्रो २ अ आणि ७ करिता ट्रॅक्शन पॉवर प्रदान करण्यासाठी रिसिव्हर सबस्टेशन (आरएसएस) बसविण्यात आले आहे. यानिमित्ताने मुंबई इन मिनिट्स या ध्येयपूर्तीकरिता आणखी एक यश मिळाल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. तर दुसरीकडे मेट्रो मार्गाचे महत्त्वाचे घटक आवश्यक वेळेत पूर्ण होतील हे सुनिश्चित करण्यासाठी तसेच आगामी महिन्यात प्रकल्पांची ट्रायल रन सुनिश्चित करण्यासाठी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी पाहणी दौरे वाढविले आहेत.
चारकोप मेट्रो डेपोला आरएसएस हा २५ केव्ही ट्रॅक्शन सप्लाय आणि ४१५ व्ही ३ फेजचा पुरवठा करेल. हे गॅस इन्सुलेटेड स्विचगियर्स नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. जे अतिशय नेटके, विश्वसनीय आणि पर्यावरणास अनुकूल असे तंत्रज्ञान आहे. मेट्रो लाइन्सच्या भविष्यातील आवश्यकतांचा विचार करता या प्रकल्पात ४०/५० एमव्हीए ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मर्स आणि १५/२० एमव्हीए ऑक्झीलरी ट्रान्सफॉर्मर्सदेखील आहेत. जे आरएसएसला २०३५ सालापर्यंत ८ कारच्या मेट्रो गाड्यांसाठीदेखील व्यवहार्य बनवते.
या दोन्ही प्रकल्पांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. कारण मेट्रो ट्रेनच्या सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक वीजपुरवठा राखण्याकरिता आरएसएस आवश्यक आहे. टाटा पॉवरकडून ११० केव्ही व्होल्टेज स्तरावर मालाडमधील सर्वात जवळच्या जीएसएसकडून भूमिगत केबल्सद्वारे आरएसएसला वीजपुरवठा होतो. दरम्यान, प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेणे, टीमकडून कामाची पूर्तता डेडलाइनमध्ये होण्याच्या अनुषंगाने आयुक्त दर आठवड्याला पाहणी दौऱ्याचे नियोजन करत आहेत. दिरंगाई टाळली जाईल आणि ट्रायल रन्स नियोजित वेळेनुसार सुरू होईल.