भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून होणाऱ्या किड्यांच्या उपद्रवापासून लवकरच मुक्ती मिळणार : खासदार गोपाळ शेट्टी
By मनोहर कुंभेजकर | Published: November 10, 2023 01:00 PM2023-11-10T13:00:14+5:302023-11-10T13:00:37+5:30
या त्रासाची गंभीर दखल घेत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अन्न महामंडळाचे महाव्यवस्थापक मनमोहन सारंग यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन केले होते.लोकमतने देखिल या संदर्भात वृत्त दिले होते.
मुंबई-बोरिवली( पूर्व ) राजेंद्रनगर येथील असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या धान्य साठविण्यासाठी असलेल्या गोदामात फार मोठ्या प्रमाणात टोके /किड्यांचा आजूबाजूला असणाऱ्या गृहसंकुलांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. या त्रासाची गंभीर दखल घेत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अन्न महामंडळाचे महाव्यवस्थापक मनमोहन सारंग यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन केले होते.लोकमतने देखिल या संदर्भात वृत्त दिले होते.
१ लाख २५ हजार टन अन्नधान्य साठविण्याची क्षमता असलेल्या या गोदामात धान्यावर टोके व किड्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास करावा लागत आहे.
तो कमी करण्यासाठी अन्न महामंडळाला खासदार गोपाळ शेट्टी यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अन्न महामंडळामार्फत तात्काळ औषधफवारणी करण्यात येईल तसेच येत्या सहा महिन्यांत आधुनिक तंत्रज्ञान वापरून किड्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे तसेच आजूबाजूच्या रहिवासी संकुल परिसरात मनपा व महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने 'निम हर्बल'ची फवारणी करण्याच्या सूचनाही महाव्यवस्थापकांनी दिल्या.
अन्नगोदामात वाहतूक करणाऱ्या ट्रक्सची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कायम स्वरूपाची उपाययोजना म्हणून मनपा व महामंडळाच्या एकत्रित प्रयत्नांनी डीपी रोड लवकरात लवकर बनवून metro cash n carry च्या बाजूने पश्चिम द्रुतगती मार्गावर ट्रक आत-बाहेर जाण्यासाठी बैठकीत तात्काळ निर्णय घेण्यात आला व तो प्रश्न मार्गीही लावला गेला. ट्रकचालकांसाठी उपाहारगृह आणि शौचालय निर्माण करण्यासाठी खासदार शेट्टी यांनी निर्देश दिले. महाव्यवस्थापक मनमोहन सारंग यांनी तातडीने त्यास मंजुरी दिली.
राजेंद्रनगर परिसरातील नागरिकांचे अन्न गोदाम महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनंतर एक आरोग्य शिबीर भरवण्याची घोषणाही खासदार शेट्टी यांनी केली. त्याचे नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. अन्न महामंडळाकडून यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आणि हे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक मनमोहन सारंग यांनी दिले.
या बैठकीला भाजपा उत्तर मुंबईचे अध्यक्ष गणेश खणकर, महामंत्री दिलीप पंडित, पूर्व नगरसेविका आसावरी पाटील, ज्येष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, मंडळ अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष सुधीर परांजपे, व्यंकटेश क्यासाराम, सुधीर सरवणकर व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.