Sharad Pawar: "आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही", पवारांचं भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:20 PM2022-07-12T17:20:21+5:302022-07-12T17:22:48+5:30
संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्यप्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला माहीत आहे.
मुंबई - सत्ता केंद्रीत करणारा प्रयत्न ताकद देण्याचा असू शकतो परंतु जनता बोलत नाही ती बघत असते, निरीक्षण करत असते. आज देशातील अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्यक्त केले. तसेच, भाजपवर एकप्रकारे इशाराही दिला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विरोधातील अडीच वर्ष लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे आवाहन केले.
संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्यप्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजुला करुन सत्ता आपल्या हातात कशी राहील असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रीत झाली तर ती एका हातात जाते ती सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे तर ती अनेक लोकांच्या हातात जाते. मात्र, हल्ली केंद्रातील सरकार केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला अगोदर कधी माहीत नव्हत्या त्या अलीकडे आल्या आहेत. ईडीचा काँग्रेसकडून कधी वापर झाला नाही. मात्र, आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी आणीबाणीची आठवण शरद पवार यांनी सांगितली आणि त्यात १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते असेही स्पष्ट केले. आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाददुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत, त्यामुळे एक वेगळं चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल असेही शरद पवार म्हणाले.