मुंबई : मेट्रो - ७ अंतर्गत येणाऱ्या अंधेरी ते दहिसरपर्यंतच्या १३ स्थानकांसाठी जिने आणि उद्वाहनांचा (लिफ्ट) पुरवठा करण्यासाठी दोघा पात्र कंपन्यांची निविदा प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली आहे. क्रेन्स/आय.एफ.ई. ही कंपनी उद्वाहने, तर जॉन्सन ही कंपनी जिने पुरविणार आहे. प्रकल्प अहवालातील दरांच्या तुलनेत उद्वाहनांसाठी ४१.८ टक्के, तर जिन्यांसाठी ३३.५ टक्के इतके कमी दर आले आहेत.प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक स्थानकासाठी किमान ४ उद्वाहने आणि ६ सरकत्या जिन्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. सरकते जिने आणि उद्वाहने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, वीजबचत आणि हरित ऊर्जेच्या वापरावर भर देणारी आहेत. अतिशय सुरक्षित, सुलभरीत्या वापरता येईल आणि आठवड्याचे सातही दिवस रोज किमान २० तास चालू राहील अशी यंत्रणा त्यात असणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली.दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांना सुलभरीत्या ये-जा करता यावी यादृष्टीने त्यात सोयी अंतर्भूत असल्याचेही राजीव यांनी स्पष्ट केले. कमी-जास्त विद्युतदाबाच्या परिस्थितीतही कार्यक्षम सेवा देणारी व्ही.व्ही.व्ही.एफ. प्रणाली, अतिरिक्त ऊर्जानिर्मितीस कारणीभूत ठरणारी ब्रेक व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीत रिमोट कंट्रोल पद्धतीने अडचणी दूर करणारी यंत्रणा अशा सोयी नव्या व्यवस्थेत अंतर्भूत आहेत. राष्ट्रीय आग प्रतिबंधक संस्थेच्या निकषांनुसार, आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सरकत्या जिन्यांवरून प्रवाशांना सुखरूपपणे खालीआणून स्थानके त्वरित रिकामी करण्याची व्यवस्थाही यात अंतर्भूत आहे.मेट्रो मार्ग २ अ (दहिसर ते डी.एन. नगर), २ ब (डी.एन. नगर ते मंडाळे/मानखुर्द) आणि मेट्रो ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) वरील ५२ स्थानकांसाठी स्वयंचलित पद्धतीने भाडे आकारणी करणाºया यंत्रणेबाबतच्या निविदाही या वेळी उघडण्यात आल्या.यातही सविस्तर प्रकल्प अहवालातील दरांपेक्षा ३२.९ टक्के इतका कमी दर प्राप्त झाला आहे. डाटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, बंगळुरू आणि ए.ई.पी. टिकिटिंग सोल्युशन्स एस.आर.एल., इटली यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.>संपर्कविरहित स्मार्ट कार्ड प्रणाली!संबंधित सर्व मेट्रो स्थानकांत स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा, भाडे व्यवस्थापन यंत्रणा, तिकीट काढण्यासाठी स्वयंचलित यंत्रे, अतिरिक्त दर कार्यालय यांसारख्या यंत्रणांचा वापरही अत्याधुनिक निकषांच्या आधारे करण्याचा निर्णयही एमएमआरडीएने केला आहे. प्रवाशांना ये-जा करण्यासाठी ६११ दरवाजे, ३५६ तिकीट विक्री कार्यालये आणि ३२८ तिकीट विक्री यंत्रे अशा यंत्रणेचीही व्यवस्था यात अंतर्भूत आहे. आय.एस.ओ. मानांकन प्राप्त संपर्कविरहित स्मार्ट कार्ड प्रणाली यासाठी वापरात आणली जाणार आहे.
‘मेट्रो ७’साठी कमी दरात अत्याधुनिक यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 2:58 AM