मुंबई : नेहरू विज्ञान केंद्रामध्ये आज नव्या थ्रीडी माहितीपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला. एसओएस प्लॅनेट असे या माहितीपटाचे नाव आहे. आपली पृथ्वी संकटात आणि या पृथ्वीतलावर राहणारे आपण मानव त्यासाठी सर्वस्वी कारणीभूत असल्याचा संदेश या माहितीपटातून देण्यात आला आहे. विकासाच्या आपल्या अवास्तव महत्त्वाकांक्षेपायी सध्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली असल्याकडे या चित्रपटात लक्ष वेधण्यात आले आहे. प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बेसुमार हानीमुळे निर्माण झालेल्या या भयंकर परिस्थितीकडे लक्ष देण्याची हीच वेळ आहे, असे या माहितीपटातून अधोरेखित केले आहे. हा माहितीपट पाहताना महासागरांची खोली आणि आर्क्टिकची कडाक्याची थंडी आणि जंगलातील थरारक अनुभव प्रत्यक्ष घेत असल्याचा आभास निर्माण होतो. थ्रीडी अॅनिमेशनचा वापर करून पृथ्वीवरील संकटात असलेले पर्यावरण अधिक गंभीर परिणाम दर्शवते. पांडा, ओरांगउटांग, अनेक साप, कासवे आणि ध्रुवीय अस्वलांसहित विविध प्राणी यांचे दर्शन यात घडते. तसेच सागरीविश्वाची अनोखी दुनिया चिमुरड्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करण्यात आला आहे. जागतिक उष्म्यामुळे त्यांच्यावर झालेले परिणाम लक्षात येतात. या माहितीपटाच्या प्रीमियरला नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टच्या सल्लागार समितीच्या अध्यक्ष डॉ. फिरोझा गोदरेज उपस्थित होत्या. नेहरू विज्ञान केंद्राकडून सर्वसामान्यांमध्ये आणि विशेषकरून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. तसेच विज्ञान संपर्काच्या नव्या पद्धतींची ओळख करून देण्यास प्रयत्नशील असलेल्या या केंद्राचे त्यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सायन्स ओडिसीत आता ‘एसओएस प्लॅनेट’
By admin | Published: July 03, 2015 1:50 AM