शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पाऊस
मुंबई : गेले काही दिवस विश्रांतीवर असलेल्या पावसाने बुधवारी मुंबईत चांगलाच जोर पकडला. विशेषत: उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात दाटून आलेल्या ढगांनी मुंबईकरांना तुफान झोडपले. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी असा तीन काळ पाऊस तुफान बरसत होता. दादर, वरळी, लोअर परळ, लालबागसह लगतच्या परिसरात दुपारी दाटून आलेल्या ढगांमुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाल्याचे चित्र होते. सायंकाळसह रात्री देखील पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र असतानाच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने ६० मिलीमीटरचा टप्पा ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
मुंबईत सकाळपासूनच पावसाने खाते उघडले होते. सकाळी रिमझिम सुरु झालेल्या पावसाने दुपारी जोर पकडला. सायन, माटुंगा, दादर, माहीम, प्रभादेवी, दादर, परळ, लालबाग, महालक्ष्मी, चिंचपोकळी, भायखळा अशा मध्य आणि दक्षिण मुंबईत दुपारी पावसाचा जोर खुप होता. विशेषत: वाहत असलेला वारा आणि मोठा पाऊस यामुळे नागरिकांना काही काळ धडकी भरली होती. दुपारनंतर अधून मधून पावसाचा जोर वाढत होता. तर याचवेळी उपनगरात मात्र पावसाचा जोर कमी होता. सायंकाळी उपनगरात विशेषत: पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्याचे चित्र होते.
मुंबईत पाऊस कोसळत असतानाच सकाळी ३०.७ मिलीमीटरवर असलेला पाऊस बहुतांश ठिकाणी ६० मिलीमीटरच्या आसपास गेला. पाऊस कोसळत असतानाच एका ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १७ ठिकाणी झाडे कोसळली. ५ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. पावसाचा जोर कालांतराने किंचित ओसरला असला तरी गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. आणि सोसाटयाचा वारा वाहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.