लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आवाज फाउंडेशनने शनिवारी रात्री ८ ते १० या वेळेत आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मुंबईत फोडण्यात आलेल्या फटाक्यांचा आवाज मोजला. ताे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी हाेता, असे निरीक्षण आवाज फाउंडेशनने नाेंदविले आहे.
शिवाजी पार्क परिसरात रात्री १० दरम्यान १०५.५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. २०१९ साली ही नोंद ११२.३, २०१८ साली ११४.१ व २०१७ साली ती ११७.८ होती. फटाके फोडताना मोठी गर्दी होती, बऱ्याच लोकांनी मास्क घातला नव्हता. असे चित्र दादरसह संपूर्ण मुंबईत शनिवारी रात्री पाहायला मिळाले. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून याची माहिती देण्यात आल्याचे आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले.
आवाज फाउंडेशनकडे बोरीवली, वरळी, दहिसर, ठाणे आणि जुहू, वर्सोवा येथील नागरिकांकडून फटाक्यांच्या आवाजाबाबत तक्रारी आल्या. कित्येक भागांमध्ये शनिवारी रात्री १० नंतर फटाके फोडण्यात आले. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा वापर कमी असल्याचे आवाज फाउंडेशनने सांगितले.
मुंबईकरांनाे शाब्बास!आम्ही लक्ष्मी पूजनादिवशी मुंबईत बहुतांश ठिकाणी आवाजाची पातळी मोजली. मात्र, दादर वगळता फार कुठे आवाज झाल्याचे निदर्शनास आले नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईत फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होण्याचे प्रमाण कमी आहे. मुंबईकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. वायू प्रदूषणाचा अहवाल पुढील दोन दिवसांत मिळेल. त्यानंतरच किती प्रदूषण झाले हे समोर येईल. - सुमैरा अब्दुलाली, आवाज फाउंडेशन