मुंबई : आवाज फाऊंडेशनने १४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते संध्याकाळी १० या वेळेत आणि दुसर्या दिवशी पहाटेपर्यंत मुंबईत फोडण्यात आलेल्या फटाक्यांचा आवाज मोजला असून, दादर येथील शिवाजी पार्क परिसरात रात्री १० दरम्यान १०५.५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे. २०१९ साली ही नोंद ११२.३, २०१८ साली ११४.१ आणि २०१७ साली ही नोंद ११७.८ होती. महत्त्वाचे म्हणजे फटाके फोडताना मोठी गर्दी होती. आणि बर्याच लोकांनी मास्क घातला नव्हता. ही परिस्थिती केवळ दादर येथे नाही तर संपूर्ण मुंबईत रात्री ८ ते १० या वेळेत होती. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले.
आवाज फाऊंडेशनकडे बोरिवली, वरळी, दहिसर, ठाणे आणि जुहू, वर्सोवा येथील नागरिकांकडून फटाक्यांच्या आवाजबाबत तक्रारी आल्या. शहरातील कित्येक भागांमध्ये रात्री १० नंतर फटाके फोडण्यात आले. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा वापर बर्यापैकी कमी होता. त्यामुळे याबाबत देखील आवाज फाऊंडेशनने मुंबई, मुंबई पोलिस व महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. दरम्यान, कोरोना रूग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो. त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते; ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो. परिणामी दिवाळीत ही बाब लक्षात घेऊन मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलझडी, अनार फोडण्यास परवानगी देण्यात आली होती. आता फटाके फोडल्यास महानगरपालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.
सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये. सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी कुठेही करता येणार नाही. हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. कार्यक्रम करता येणार नाहीत. भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.