मुंबई- Milind Deora on Uddhav Thackeray ( Marathi News ) महाविकास आघाडीत दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून तिढा होता, ही जागा काँग्रेसला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाड यांनी धरला होता. परंतु या जागेवर उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंची उमेदवारी घोषित केली. मात्र वर्षा गायकवाड या दलित असल्यानं खुल्या जागेवर त्यांना तिकीट दिले तर त्यांचा पराभव होईल असं उद्धव ठाकरेंनीकाँग्रेसला सांगितल्याचा दावा शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केला आहे.
याबाबत खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल असं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला कळवली अशी माहिती माझ्याकडे आहे. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे असंही देवरा यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही या निवडणुकीत तीन दलित समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरु आहे. कारण काँग्रेस आणि उबाठामध्ये दलित समाज बांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला.