Join us

दक्षिण मध्य मुंबईत शेवाळे-गायकवाड थेट लढत, सोशल मिडीयात पडसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 2:12 AM

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राहुल शेवाळे विरुद्ध आघाडीचे एकनाथ गायकवाड यांच्यात थेट लढत असली, तरी सोशल मीडियावर त्याचे पडसाद नाहीत

मुंबई : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राहुल शेवाळे विरुद्ध आघाडीचे एकनाथ गायकवाड यांच्यात थेट लढत असली, तरी सोशल मीडियावर त्याचे पडसाद नाहीत. ट्रोल, असभ्य भाषा, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाला सध्यातरी इथे जागा नाही. सोशल मीडियावर उमेदवारांचा वावर अगदी सोज्वळ म्हणावा या प्रकारातला आहे.

एकनाथ गायकवाडांच्या तुलनेत राहुल शेवाळेंचा सोशल मीडियातील वावर परिणामकारक आणि मोठा आहे. शेवाळेंच्या अधिकृत फेसबुक पेजला आतापर्यंत ६१,६९२ लोकांनी लाइक केले आहे, तर त्यांचे ट्विटरवर अकाउंटसुद्धा व्हेरिफाइड आहे. २२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गायकवाडांचे ट्विटर अकाउंट नाही. फेसबुकवरही केवळ ८२३ पेज लाइक्स आहेत.

निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठीच या अकाउंटचा वापर होतो आहे. दिवसभराच्या प्रचारसभा, पदयात्रा, मेळाव्याचे वेळापत्रक, फोटो, भाषणाचे व अन्य व्हिडीओ टाकण्यावरच उमेदवारांचा भर आहे. एकमेकांवर टीका अथवा कुरघोडीचे प्रकार फारसे नाहीत. पोस्ट आणि ट्विटरवर नजर फिरविली असता, शेवाळे निवडणुकीच्या आधीपासूनच सोशल मीडियात असल्याचे जाणवते. स्वत:च्या पोस्टसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातील पोस्टही दिसतात.

त्या तुलनेत गायकवाडांचा सोशल मीडिया मात्र, अगदी अलीकडेच अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. त्यातही त्यांच्यापेक्षा अन्य लोकांनी टॅग केलेले पोस्टच जास्त आहेत. दोन्ही उमेदवारांनी ईव्हीएमवरील आपला क्रमांक नाव आणि चिन्ह असलेले फोटो मात्र आवर्जून पोस्ट केले आहेत. अमुक क्रमांकावरील बटन दाबून मत देण्याचे आवाहन त्या माध्यमातून करण्यात येत आहे.

प्रमुख उमेदवारराहुल शेवाळे-शिवसेनाफेसबुक 61,692 पेज लाइक्स6 पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट.ट्विटर 22,000 फॉलोअर्स5 पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट.कोणत्या मुद्द्यांवर भरविकासकामे, संसदेतील कामगिरीवर भर. स्मारके, गावठाण सीमांकन, पुनर्विकासासाठीच्या परवानग्या आणल्या.परवानग्या, 

एकनाथ गायकवाड काँग्रेसफेसबुक 823 पेज लाइक्स5 पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट

ट्विटर - 0 केंद्रीय आणि प्रदेश काँग्रेसच्या प्रचारातील फोटो अधिक पोस्टचा भडिमार. जाहीरनाम्याचेही फोटो.संविधान वाचविण्यासाठी, न्याय योजना, महिला, युवक सक्षमीकरणासाठी परिवर्तनाची हाक.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमुंबई दक्षिण मध्यमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019