दक्षिण, पूर्व मुंबई उपनगरे पुरासाठी जास्त संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:16+5:302021-06-05T04:06:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अशाश्वत शहरीकरण, नियोजनशून्य विकास आणि किनारपट्टीची झीज यामुळे दक्षिण आणि पूर्व मुंबई उपनगरे पुरासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अशाश्वत शहरीकरण, नियोजनशून्य विकास आणि किनारपट्टीची झीज यामुळे दक्षिण आणि पूर्व मुंबई उपनगरे पुरासाठी जास्त संवेदनशील बनलेली आहेत. संवेदनशीलतेच्या भूशास्त्रीय, भौतिक आणि सामाजिक-आर्थिक निकषांवर आधारलेल्या एकूण १२ निकषांवर मुंबईच्या एकूण २७४.१ किलोमीटर किनारपट्टीपैकी ५५.८३ किलोमीटर किनारपट्टी अतिशय कमी संवेदनशील, ६०.९१ किलोमीटर मध्यम संवेदनशील, तर ५०.७५ किलोमीटर अतिशय संवेदनशील प्रकारात मोडते आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २००५ साली खारफुटीच्या जंगलांवरील अतिक्रमणांवर बंदी घालूनही प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दलदलीच्या जागेवर कब्जा करण्यावर २०१४ मध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र, अजूनही ते थांबलेले नाही. या क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुरेशी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे असुरक्षित लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी बनलेले कायदे विकासाला चालना देण्यासाठी शिथिल केले जात आहेत.
दरम्यान, मुंबईच्या किनारपट्टीची असुरक्षितता निश्चित करण्यासाठी संशोधकांनी १२ वेगवेगळ्या निकषांवर आधारित किनारपट्टीत होत गेलेले बदल उच्च गुणवत्तेच्या उपग्रह चित्रांच्या माध्यमातून टिपले आहेत. १९७६ पासून १९९०, २००२ आणि २०१५ या काळातील किनारपट्टीत होत गेलेले बदल नोंदवण्यात आले.
* हे आहेत पुरासाठीचे अतिसंवेदनशील भाग
- पूर्व उपनगरे : कुर्ला, देवनार, शिवाजीनगर, ट्रॉम्बे कोळीवाडा, ठाणे खाडीचा पश्चिम भाग
- उत्तर मुंबई : गोराई, मीरा भाईंदर, अंधेरी पश्चिमचा काही भाग
- दक्षिण मुंबई : कुलाबा, बीपीटी कॉलनी, कफ परेड, वरळी, दादर चौपाटी, गिरगाव
- इतर भाग : नवी मुंबईचा काही भाग, उत्तन, उरण, अलिबाग, मुरुड
---------------------------