मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावरील मेट्रोच्या कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वेरावली गुंफेपर्यंतच्या विस्तारित उड्डाणपुलाचा तिढा सुटला आहे. या पुलाच्या विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाल्याने लवकरच त्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अंदाजे दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होणार असून, यामुळे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.जोगेश्वरी पूर्व-पश्चिम (दक्षिण) जोडणारा हा पूल काही वर्षांपूर्वीच उभारण्यात आला. बांद्रेकरवाडी येथे हा पूल उतरविण्यात आला. पूल वाहतुकीस खुला करण्यात आल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटण्यास काही अंशी मदत झाली. मात्र जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहतुकीच्या कोंडीत वाढ झाली. परिणामी, ही कोंडी फोडण्यासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड व पश्चिम द्रुतगती मार्ग जंक्शन ते महाकाली गुंफेपर्यंत असणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बांद्रेकरवाडी ते वेरावली महाकाली गुंफेपर्यंत उड्डाणपूल विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविण्यात आला होता. याबाबतचे काम सुरू करण्यासाठी तसेच या मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी बैठकाही घेण्यात आल्या होत्या. मात्र पश्चिम द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे या उड्डाणपुलाचे काम गेले अनेक वर्षे रखडले होते. अखेर मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतलेल्या बैठकीत हा प्रश्न तडीस लावण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
दक्षिण उड्डाणपुलाचा तिढा सुटला
By admin | Published: March 14, 2017 4:25 AM