दक्षिण कोरियाचे ‘समृद्धी’साठी अर्थसहाय्य! किम डाँगयून यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:32 AM2017-09-28T02:32:38+5:302017-09-28T02:32:54+5:30
महाराष्ट्राशी असलेले आर्थिक संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबरोबरच, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास दक्षिण कोरियाने उत्सुकता दाखविली आहे.
मुंबई : महाराष्ट्राशी असलेले आर्थिक संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबरोबरच, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास दक्षिण कोरियाने उत्सुकता दाखविली आहे. दक्षिण कोरियाचे उपपंतप्रधान तथा वित्तमंत्री किम डाँगयून यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी याबाबत स्योल येथे चर्चा झाली.
दक्षिण कोरियाच्या वित्तीय संस्थांकडून होणाºया वित्तपुरवठ्याबाबत किम डाँगयून यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे ही चर्चा महत्त्वाची मानली जाते.
विविध उद्योगांशी चर्चा
दक्षिण कोरियातील कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध उद्योग समूहांबरोबर झालेल्या चर्चेत केले. ह्योसंग कॉपोर्रेशनसोबतच्या बैठकीने मुख्यमंत्र्यांनी दिवसभराच्या बैठकींच्या सत्राचा प्रारंभ केला. कॉपोर्रेशनचे अध्यक्ष आणि कॉपोर्रेट स्ट्रॅटेजी सेंटरचे प्रमुख एच. एस. चो, तसेच इंडस्ट्रियल मटेरियल्स परफॉर्मन्स ग्रुपचे उपाध्यक्ष यू सूक च्युन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ह्योसंग कॉपोर्रेशन ही दक्षिण कोरियातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून, स्पॅन्डेक्सच्या निर्मितीत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास त्यांनी अनुकूलता दर्शविली.
त्याचबरोबर, ह्युंदाई इंजिनीअरिंग अँड कंस्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सू ह्यून ज्युंग यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. महाराष्ट्रात चाकण येथे ह्युंदाईचा प्रकल्प कार्यरत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आणि वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गासंदर्भात कंपनीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष जेफ हाँग आणि इंडिया प्रोजेक्टचे प्रमुख डी. एच. कू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात शेतकºयांना सौर कृषी पंप देण्यासाठी सुरू असलेल्या स्वतंत्र फीडरच्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी एलजी कंपनीला केली. देवू इंजिनीअरिंग अँड कंस्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साँग मून सून यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दक्षिण कोरियात प्रशिक्षणासाठी आलेल्या १५ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाºयांच्या पथकानेही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
नागपूर करार व्यापक करण्यासाठी चर्चा
पॉस्कोशी केलेल्या दोन सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीला गती देण्यासंदर्भात, मुख्यमंत्र्यांनी पॉस्कोचे व्यवस्थापकीय संचालक ओ इन ह्यान यांच्याशी चर्चा केली. पॉस्को ही स्टील उत्पादनातील आघाडीची कंपनी असून, त्यांचे विले भागड (जि. रायगड) आणि तळेगाव (जि. पुणे) येथे दोन प्रकल्प सुरू आहेत.
नागपूर येथे एलसीडी फॅब युनिट उभारण्यासाठी मेक इन इंडिया कॉन्क्लेव्हदरम्यान टिष्ट्वनस्टारसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला होता. हा करार आणखी व्यापक करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.